Imran Khan Nominated for Peace Nobel Prize: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या विविध गुन्ह्यांसाठी कैदेत असणारे इम्रान खान यांना शांततेचं नोबेल दिलं जावं, अशी शिफारस करण्यात आली आहे. नॉर्वेमधील पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सने इम्रान खान यांच्या नावाची शिफारस केली असून पाकिस्तानमधील लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी मोठं काम केल्याचा दावा या शिफारशीसोबत करण्यात आला आहे. इम्रान खान यांना नोबेल पुरस्कार देण्यासाठी दुसऱ्यांदा अशी शिफारस करण्यात आली आहे.
Pakistan World Alliance अर्थात पीब्लूए या गटाची नॉर्वेमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात स्थापना झाली आहे. या गटाकडून पाकिस्तामध्ये मानवी हक्कांसंदर्भात व लोकशाही मूल्य रुजवण्याबाबत इम्रान खान यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. “इम्रान खान यांच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे”, अशी पोस्ट या गटाने एक्सवर शेअर केली आहे. पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स हा गट नॉर्वेमधील पार्टिएट सेंट्रम पक्षाशी संलग्न आहे.
याआधी इम्रान खान यांनीच नामांकनाला दिला होता नकार!
दरम्यान, २०१९ मध्ये इम्रान खान यांच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. तेव्हा भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी मोठं काम केल्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत प्रस्तावदेखील सादर केल्याचा संदर्भ तेव्हा देण्यात आला होता. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानच्या कैदेतून सुटका करून इम्रान खान यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मदत केल्याचा दावा या प्रस्तावात करण्यात आला होता.
इम्रान खान यांनी मात्र या नामांकनाला नकार दिला होता. “आपण या पुरस्कारासाठी पात्र नाही आहोत. खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी पात्र ती व्यक्ती असेल, जी काश्मीरमधील लोकांच्या कलानुसार काश्मीर प्रश्नाची सोडवणूक करेल आणि या भागात शांतता व विकासासाठी प्रयत्न करेल”, असं इम्रान खान तेव्हा म्हणाले होते.
इम्रान खान सध्या कैदेत
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व तेहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान सध्या कैदेत आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कार्यकाळाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. सध्या इम्रान खान पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील अदियाला तुरुंगात आहेत. २०२३ पासून ते त्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.