गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमधली आर्थिक स्थिती अत्यंत कठीण झाली आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी तर आधीच पाकिस्तान दिवाळखोर झाल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची स्थिती पाकिस्तानात निर्माण झाली आहे. अनेक देशांकडे पाकिस्ताननं मदतीसाठी हात पुढे केला असताना खुद्द पाकिस्तानमधले राजकारणी मात्र ऐशोआरामात असल्याचं पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष नवाज शरीफ यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंवरून नवाज शरीफ चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये नवाज शरीफ एका आलिशान कारमधून उतरताना दिसत आहेत. हे व्हिडीओ लंडनमधील असल्याचा दावा पाकिस्तानमधील विरोधी पक्षाचे नेते फवाद हुसेन यांनी केला आहे. नवाज शरीफ लंडनमधील प्रसिद्ध बाँड स्ट्रीटवर महागड्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना दिसत असल्याचं फवाद हुसेन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. तसेच, यावरून फवाद हुसेन यांनी नवाज शरीफ यांच्यावर टीकाही केली आहे. फवाद हुसेन यांच्याप्रमाणेच पाकिस्तानमधील इतर नेत्यांनीही नवाज शरीफ यांच्यावर या आलिशान थाटावरून टीका केली आहे.
काय म्हटलंय फवाद हुसेन यांनी?
फवाद हुसेन यांनी नवाज शरीफ यांचा हा व्हिडीओ ट्वीट करून त्यावर तोंडसुख घेतलं आहे. “रोल्स रॉयसेमधून बाहेर पडून (लंडनमधील) बाँड स्ट्रीटवर शॉपिंग करणारे नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेचे फराप आरोपी आहेत. त्यांना ५० रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलं आहे. पण आता ते लंडनमधून पाकिस्तानच्या नागरिकांचं भवितव्य ठरवत आहेत. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानची आज वाईट अवस्था झाली आहे”, असं या ट्वीटमध्ये फवाद यांनी म्हटलं आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाकडूनही खोचक टीका
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाकडूनही नवाज शरीफ यांच्या या ‘शॉपिंग’चा समाचार घेण्यात आला आहे. “नवाज शरीफ लंडनमध्ये आलिशान कारमधून महागड्या मॉलमध्ये आपला प्लेटलेट काऊंट घ्यायला गेले होते. रक्त चाचण्यांचे अहवालही घ्यायला गेले होते”, असा टोला पीटीआयच्या नेत्या शफीना इलाही यांनी लगावला आहे.
दरम्यान, एकीकडे नवाज शरीफ यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्यामुळे जागतिक पातळीवर आणि आशियामध्ये चिंता व्यक्त होताना दिसत आहे.