पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडलेले नेते इम्रान खान हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकांमुळे कायम चर्चेत राहिले आहेत. इम्रान खान यांनी सातत्याने भारतावर टीकात्मक धोरण स्वीकारलं आहे. मात्र, आता इम्रान खान यांनी भारताचं आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं आहे. जे पाकिस्तानला जमलं नाही, ते भारतानं करून दाखवल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत.
पाकिस्तान आर्थिक संकटात!
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक संस्था आणि देशांकडून पाकिस्ताननं मदत मिळवण्यासंदर्भात पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यात आर्थिक दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आरोपांमुळे इम्रान खान यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे पाकिस्तानमधील अनागोंदीमध्ये आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील सरकार सध्या देशातील आर्थिक संकट, प्रचंड वेगाने वाढणारी महागाई आणि त्यामुळे देशांतर्गत निर्माण झालेली अशांतता आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
इम्रान खान यांची स्तुतिसुमनं!
याचदरम्यान, इम्रान खान यांनी रशियाकडून भारताला पुरवठा होणाऱ्या कच्च्या तेलाच्या संदर्भात भारतीय परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं आहे. “पाकिस्तानसाठी रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात होऊ शकली नाही याचा मला खेद आहे. माझं सरकार कोसळल्यामुळे हे शक्य होऊ शकलं नाही”, असं इम्रान खान म्हणाले आहेत.
विश्लेषण: दलाई लामांनी हे असे का केले? काय आहे बौद्ध वज्रयान पंथाची परंपरा?
गेल्या वर्षीच इम्रान खान यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली होती. त्यानंतर कच्च्या तेलासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाकिस्तानमधील महागाईचा विचार करता स्वस्त दरातल्या कच्च्या तेलामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यात काही अंशी यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. “क्वाडचे सदस्य असूनही अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता भारतानं रशियाकडून स्वस्त दरात कच्चं तेल मिळवलं. आपल्या सरकारकडूनही अशाच प्रकारे स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न सुरू होते”, असं इम्रान खान यांनी नमूद केलं.
दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री पेट्रोलियम मुसादिक मलिक यांनी पाकिस्तानात एप्रिल महिन्यात रशियाकडून येणाऱ्या कच्च्या तेलाचं पहिलं जहाज पोहोचेल, अशी माहिती दिली आहे.
याआधीही इम्रान खान यांनी केलं होतं भारताचं कौतुक
दरम्यान, याआधीही इम्रान खान यांनी भारत सरकारचं कौतुक केलं होतं. “नवाज शरीफ यांच्याव्यतिरिक्त जगातल्या इतर कोणत्याही नेत्याची देशाबाहेर कोट्यवधींची मालमत्ता नाही. अगदी शेजारी देश असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तरी देशाबाहेर किती मालमत्ता आहेत?” असा प्रश्न इम्रान खान यांनी उपस्थित केला होता.