Pakistani family in India: ठाण्यातील उल्हासनगरमधून पोलिसांनी नुकतीच एका बांगलादेशी ॲडल्टस्टारला अटक केली. रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख असे या महिलेचे नाव होते. त्यानंतर आता बंगळुरूमधूनही एका पाकिस्तानी कुटुंबाला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांनी रविवारी रशिद अली सद्दिकी (४८), त्याची पत्नी आयेशा (३८) आणि त्याचे सासू-सासरे हनीफ मोहम्मद (७३), रुबिना (६१) यांना राजपुरा गावातून अटक केली. या कुटुबांने अनुक्रमे शंकर शर्मा, आशा रानी, राम बाबू शर्मा आणि रानी शर्मा अशी नावे धारण केली.
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीनंतर बंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली. ढाकाहून दोन पाकिस्तानी नागरिक चेन्नई विमानतळावर उतरले होते. यावेळी विमानतळ अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर चौकशी केली असता त्यांचे पारपत्र बोगस असल्याचे कळले. चौकशीदरम्यान ते सिद्दिकीशी संबंधित असल्याचे समजले.
रविवारी पोलीस जेव्हा सिद्दिकीला अटक करण्यासाठी घरी पोहोचले, तेव्हा सिद्दिकी आणि कुटुंबिय बॅग भरून स्थळ बदलण्याच्या तयारीत होते. सिद्दिकीची चौकशी केल्यानंतर ते २०१८ पासून बंगळुरूमध्ये राहत असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्यांच्या पारपत्र आणि आधार कार्डवरही हिंदू नावे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शर्मा असे नाव बदलून राहत असले तरी त्यांच्या घरातील भिंतीवर “मेहदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न-ए-युनूस”, असे लिहिलेले होते. तसेच भिंतीवर काही मौलवींचे फोटो होते.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सिद्दिकी उर्फ शंकर शर्मा याने पाकिस्तानी असल्याचे कबू केले. तो स्वतः कराचीजवळील लियाकताबाद येथे राहणारा आहे. तर त्याचे कुटुंबीय लाहोर येथे राहत होते. सिद्दिकीने सांगितले की, २०११ साली त्याने आयेशाबरोबर ऑनलाईन लग्न केले होते. तेव्हा आयेशा तिच्या पालकांसह बांगलादेशमध्ये राहत होती. पाकिस्तानमध्ये मेहदी फाऊंडेशनचे धार्मिक कार्य करत असल्यामुळे सिद्दिकीला देशाबाहेर काढण्यात आले होते.
बंगळुरूमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सिद्दिकी बांगलादेशमध्ये गेला आणि तिथे त्याने मेहदी फाऊंडेशनच्या खर्चावर पुन्हा धर्मप्रसार सुरू केला. मात्र २०१४ साली बांगलादेशमधून त्याला विरोध झाला. त्यामुळे त्याने भारतातील मेहदी फाऊंडेशनचे काम करणाऱ्या परवेज नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधून सिद्दिकी भारतात आला. पश्चिम बंगालच्या मालदा येथून एका एजंटच्या मदतीने सिद्दिकी आणि त्याची पत्नी, सासू-सासरे, नातेवाईक झैनबी नूर आणि मोहम्मद यासीन हे अवैधरित्या भारतात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दिकी भारतात आल्यानंतर ते सुरुवातीला काही दिवस दिल्लीत राहिले. त्यानंतर त्यांनी शर्मा नावाने बोगस पारपत्र, आधार कार्ड आणि वाहन चालक परवाना तयार केला. दिल्लीमध्ये मेहदी फाऊंडेशनच्या प्रचाराचे काम या काळात सिद्दिकीने केली.
२०१८ साली वसीम आणि अल्ताफ यांची नेपाळमध्ये भेट झाल्यानंतर सिद्दिकीने बंगळुरूमध्ये स्थायिक होऊन तिथेच धर्मप्रचार करण्याचा निर्णय घेतला. अल्ताफने सिद्दिकीच्या राहण्याची व्यवस्था केली. सिद्दिकीच्या सासू सासऱ्याने बंगळुरू येथे बँक खातेही उघडले होते. सिद्दिकी धर्मकार्याबरबोरच गॅरेजेसना इंधन पुरविणे आणि खाद्यपदार्थ विक्रीचे काम करत होता. पोलिसांनी विविध कलमांखाली सिद्दिकी आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हे दाखल केले आहेत.