पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख मोहसीन बट सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांना पत्रकाराकडून प्रश्न विचारण्यात आला. दाऊद इब्राहिम आणि भारतासाठी मोस्ट वॉटेंड असलेला दहशतवादी हाफिज सईदला भारताला सोपवणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मोहसीन बट यांना केला. तेव्हा तोंडावर बोट ठेवत या प्रश्नांना उत्तर देणं बट यांनी टाळलं. इंटरपोलच्या आमसभेतील हा व्हिडीओ ‘एएनआय’ या वृत्त संस्थेनं ट्वीट केला आहे.
मोहसीन बट हे पाकिस्तानच्या ‘फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’चे (FIA) महासंचालक आहेत. दिल्लीतील इंटरपोलच्या आमसभेसाठी पाकिस्तानने पाठवलेल्या दोन सदस्यीय शिष्टमंडळाचे ते सदस्य आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्यामुळे तणाव असतानाचं पाकिस्तानचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा मांडल्यानंतर इतर जागतिक मंचांवरही मुद्दा उपस्थित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यामुळे इंटरपोलच्या या आमसभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
इंटरपोलच्या कामकाजाशी निगडीत मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी दरवर्षी सर्व देशाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही आमसभा घेण्यात येते. या सभेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले आहे. चार दिवसीय या आमसभेत जगातील १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. मंत्री, देशांचे पोलीस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या अध्यक्षांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी या सभेत सहभागी झाले आहेत. २५ वर्षांनंतर इंटरपोलची आमसभा भारतात आयोजित करण्यात आली आहे.