पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानच्या हंगामी पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज गट) सध्याचे अर्थमंत्री इशाक दार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी रविवारी दिले. मात्र, यासंबंधीचा अंतिम निर्णय आघाडी सरकारमधील अन्य पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बेलआऊट पॅकेज मिळवण्यात इशाक दार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाहबाज शरीफ सरकार पाकिस्तानचा निवडणूक कायदा, २०१७ यामध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार हंगामी सरकारला घटनात्मक अधिकारांच्या मर्यादेपलीकडे निर्णय घेता येतील.
पाकिस्तानात अलीकडेच अमलात आणलेल्या आर्थिक योजनेमध्ये सातत्य राखणे आणि सरकारी मालकीच्या उद्योगांमध्ये परदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियांना वेग देणे या हेतूने दार यांचे नाव चर्चेत आल्याचे एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तात नमूद केले आहे.