पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो जरदारी पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशने ( एससीओ ) आयोजित केलेल्या एका बैठकीसाठी भुट्टो येणार आहेत. ही बैठक गोव्यात ४ आणि ५ मे रोजी होणार आहे. याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुमताज बलोच यांनी गुरूवारी ( २० एप्रिल ) ही माहिती दिली.
गेल्या १२ वर्षात बिलावल भुट्टो जरदारी हे भारत दौऱ्यावर येणारे पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री असणार आहेत. यापूर्वी तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार या २०११ साली भारत दौऱ्यावर आल्या होत्या. गोव्यात होणाऱ्या या बैठकीला भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकस्तान, तजाकिस्तान, उबेकिस्तान, किर्गिझस्तानचे प्रतिनिधी सहभागी होतील.
हेही वाचा : अमृतपाल सिंगच्या पत्नीला अमृतसर विमानतळावरून घेतलं ताब्यात, लंडनला पळून जाण्याच्या होती तयारीत
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “बिलावल भुट्टो जरदारी यांचा दौरा शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनला बांधील असल्याचं दर्शवण्यासाठी आहे.”
अनेक वर्षापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं संबंध
मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला, पठाणकोट हल्ला, उरी हल्ला, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. गेल्या काही वर्षापासून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये कोणत्याही प्रकाराचा संवाद झाला नाही आहे.
हेही वाचा : “लोकांना काँग्रेसला मतदान करायचं आहे, पण…”, माजी मुख्यमंत्र्यांनी हायकमांडची केली कानउघडणी
पाकिस्तानकडून भारताबरोबर संबंध सामान्य करण्यासाठी अनेकदा आवाहन करत चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला आहे. पण, भारताने सीमेपलीकडील दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत चर्चा करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्याशिवाय पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर सातत्याने मांडला होता. त्यावर भारताने वेळोवेळी आक्षेपही नोंदवला आहे.