सीमेपलीकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्न आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे वाढते प्रकार या बाबत संरक्षणमंत्री ए. के. अॅण्टनी यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान लष्कराच्या छुप्या पाठिंब्याविना हे प्रकार शक्य नसल्याचे मतही अॅण्टनी यांनी व्यक्त केले आहे.
सीमेवर होणाऱ्या घडामोडींकडे आमचे बारकाईने लक्ष आहे. घुसखोरीचे प्रयत्न रोखण्यासाठी किंवा घुसखोरीचे प्रकार कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाही या प्रकारांमध्ये वाढच होत आहे. याचा अर्थ सीमेपलीकडून अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत आहे, असेही अॅण्टनी म्हणाले.
तथापि, हे प्रकार पाकिस्तान लष्कराच्या पाठिंब्याविना होऊ शकत नाहीत, याची आपल्याला खात्री आहे. त्यामुळे आपल्यासाठी ही चिंतेची बाब आहे. पाकिस्तानच्या सशस्त्र दलाच्या पाठिंब्याविना असे प्रकार कसे होऊ शकतात, असा सवालही संरक्षणमंत्र्यांनी केला. आंतरराष्ट्रीय सीमेवर एका बाजूला भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचा पहारा आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान लष्कर आणि पाकिस्तानच्या रेंजर्सचा पहारा आहे, असेही ते म्हणाले.