बेनौलिम (गोवा) : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी गुरुवारी भारतात दाखल झाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. गोव्यातील बेनौलिम येथे ही परिषद होत आहे. पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही प्रथमच वेळ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहशतवादाच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना भुत्तो भारत दौऱ्यावर आले आहेत. मात्र त्यांची भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी स्वतंत्र चर्चा होणार आहे की नाही याबद्दल सध्या काहीही नियोजन नाही. कारण दोन्ही बाजूंनी तशी कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही. ‘एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी गोव्यात येऊन मला फार आनंद झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया भुत्तो यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ‘पाकिस्तान एससीओच्या ध्येयाशी कटिबद्ध असल्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला,’ असे  पाकिस्तानातून निघण्यापूर्वी भुत्तो म्हणाले होते.

बिलावल भुत्तो झरदारी यांच्या रूपाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात आले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खर भारतात आल्या होत्या. सध्या त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक काही तास भेट दिली होती.

एससीओच्या जाहीरनाम्याशी कटिबद्ध – शहबाज शरीफ

भारतामधील एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय म्हणजे एससीओचा जाहीरनामा आणि बहुस्तरीय पातळीवर संवाद साधण्याशी कटिबद्धता असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला. एससीओच्या प्रादेशिक भागामध्ये शांतता आणि स्थैर्य कायम राहावे यासाठी पाकिस्तानला आपली भूमिका बजावयची आहे असे  ट्वीट त्यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan foreign minister bilawal bhutto zardari on india visit to attend zws