देशात पुराने थैमान घातलेलं असताना भारताने कोणतीही मदत न केल्याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नाराजी जाहीर केली आहे. न्यूयॉर्कमध्ये फ्रान्स २४ ला दिलेल्या मुलाखतातीत बिलावल भुट्टो यांना भारताकडे काही मदत मागितली आहे का? किंवा काही मदत मिळाली आहे का? अशी विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी दोन्ही प्रश्नांना नाही असं उत्तर दिलं. यावेळी बोलताना त्यांनी भारत आता पूर्वीप्रमाणे धर्मनिरपेक्षा राहिला नसल्याचीही टीका केली. तसंच येथील मुस्लीम असुरक्षित असल्याचा गंभीर आरोपही केला.
भारताशी सध्याच्या घडीला असणाऱ्या संबंधांवर ते म्हणाले “आमचा फार जुना आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. दुर्दैवाने आजचा भारत बदललेला आहे. स्थापनेच्या वेळी नागरिकांना आश्वस्त केलेला धर्मनिरपेक्ष भारत आता राहिलेला नाही”.
“अल्पसंख्यांक असणाऱ्या ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या आधारे भारत आता हिंदूंचं वर्चस्व असणारा देश बनत आहे. फक्त भारतातच नाही तर दुर्दैवाने बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्येही हे दिसत आहे,” असा आरोप बिलावल भुट्टो यांनी केला.
२०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करताना बिलावल भुट्टो यांनी भारताने घेतलेले काही निर्णय आणि कारवाया यामुळे त्यांच्यासोबत असणारे संबध अधिक कटू झाल्याचं सांगितलं. “संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचं उल्लंघन, वादग्रस्त ठिकाणांच्या सीमा बदलणं यामुळे चर्चेच्या संधी फार कमी झाल्या आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी भारतात अल्पसंख्यांक असणारे मुस्लीम असुरक्षित असल्याचा आरोप केला. ते म्हणाले “भारत अशाच प्रकारे आपल्या मुस्लीम नागरिकांना वागणूक देत आहे. मग ते पाकिस्तान आणि काश्मीरमधील मुस्लिमांना कशी वागणूक देत असतील याचा विचार करा”. मात्र दोन्ही देशातील तरुणाईला शांतता हवी असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.