पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासह संबंध सुधारावेत अशी आपली इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे. मात्र भारतात भाजपा सत्तेत असताना तसं होण्याची अजिबात शक्यता नाही असंही ते म्हणाले आहेत. ‘The Telegraph’ ला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी एकमेकांशी व्यापार केल्यास कोणते आर्थिक फायदे होऊ शकतात यावर भाष्य केलं.
“फायदे खूप असतील, पण काश्मीरचा मुद्दा हा मुख्य अडथळा आहे,” असं मत इम्रान खान यांनी माडलं आहे. “मला वाटतं हे शक्य आहे, पण भाजपा सरकार खूप कट्टर आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांची राष्ट्रवादी भूमिका आहे,” असं इम्रान खान म्हणाले आहेत.
इम्रान खान यांचा परकीय षडयंत्राचा दावा तथ्यहीन; अमेरिकेची टीका
“ते सतत राष्ट्रीय भावनांना फुंकर घालत असल्याने कोणताही करार न होणं निराशाजनक आहे. एकदा हा राष्ट्रवादाचा जीन बाटलीतून बाहेर पडला की, त्याला पुन्हा आत घालणं कठीण आहे,” असंही इम्रान यांनी म्हटलं आहे. “काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी योग्य योजना हवी,” असंही मत त्यांनी यावेळी मांडलं.
भारताने पाकिस्तानला अनेकदा दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात आपले संबंध सामान्य व्हावेत असं सांगितलं आहे. भारत सरकारने ३७० कलम हटवत काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर संबंध कटू झाल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत.