पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तोशखाना प्रकरणामध्ये १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. आता या प्रकरणात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांची १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा स्थगित केली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर असताना इम्रान खान यांनी त्यांना मिळालेल्या महागड्या सरकारी भेटवस्तू ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हणजे ३१ जानेवारीला तोशाखाना प्रकरणामध्ये इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना शिक्षा झाली होती. तसेच इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास निर्बंध घालण्यात आले होते. याबरोबरच दोघांनाही प्रत्येकी ७८७ पाकिस्तानी दशलक्ष रुपयांचा (जवळपास २३ कोटी) दंड भरण्याचे आदेश देण्यात आला होता.
हेही वाचा : Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
यानंतर या प्रकरणाची सुनावणी इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर पार पडली. यावेळी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच या शिक्षेविरोधातील याचिकेवर ईदच्या सुट्टीनंतर सुनावणी पार पडेल, असे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
तोशखाना प्रकरण नेमके काय आहे?
पाकिस्तानधील एका शासकीय विभागाचे तोशखाना हे नाव आहे. पाकिस्तानमध्ये लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या भेटवस्तू या तोशखाना विभागामध्ये जमा कराव्या लागतात. मात्र, इम्रान खान यांनी त्यांना मिळाळेल्या मौल्यवान भेटवस्तू जमा न करता विकल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तसेच त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाला दिली नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इम्रान खान २०१८ मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर होते. यावेळी त्यांना मिळालेल्या मौल्यवान भेट वस्तू तोशखाना विभागात जमा न केल्याप्रकरणी विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.