Nawaz Sharif on Pm Narendra Modi: पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO च्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी १६ ऑक्टोबर रोजी इस्लामाबाद, पाकिस्तानला भेट दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. या दौऱ्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. एस. जयशंकर यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात नव्याने संवाद सुरू होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच मागचे सगळे विसरून भविष्यातील ऊर्जा आणि हवामान बदल या विषयांवर एकत्रित काम करता येऊ शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेशी संवाद साधताना नवाझ शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांना पुन्हा उभारी देण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. “आपण जिथून संवाद सोडला होता, तिथून तो पुन्हा चालू करायला हवा. मागच्या ७५ वर्षांत जे झाले, त्याचा विचार न करता आपल्याला पुढची ७५ वर्ष वाया घालवायची नाहीत”, असे ते म्हणाले.

मोदी पाकिस्तानात आले असते तर…

नवाझ शरीफ पुढे म्हणाले, “शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन बैठकीसाठी एस. जयशंकर आले, ही संवादाची सुरुवात आहे. पण जर नरेंद्र मोदी या बैठकीसाठी पाकिस्तानात आले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. आपण आपले शेजारी बदलू शकत नाहीत. पण आपण चांगले शेजारी म्हणून नक्कीच राहू शकतो.”

हे वाचा >> Video: अवघ्या २० सेकंदांची भेट, जुजबी चर्चा आणि भेट संपली; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी अत्यल्प चर्चा!

एस. जयशंकर एससीओच्या बैठीकत काय म्हणाले?

दरम्यान एस. जयशंकर यांनी शांघाय ऑर्गनायझेशन बैठकीत बोलत असताना सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर तोफ डागली. सीमेपलीकडून तीन प्रकारच्या राक्षसांना पोसले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे तीन राक्षस म्हणजे, दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटिरतावाद असल्याचे ते म्हणाले. या तिघांमुळे दोन्ही देशात व्यापार, दळणवळण आणि ऊर्जा वहन करण्यास अडचणी येतात, असेही ते म्हणाले.

गेल्या ९ वर्षांमध्ये भारताच्या केंद्रीय मंत्र्याने पाकिस्तानचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीचा असा दौरा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५ मध्ये केला होता. त्यावेळी त्यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इस्लामाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये भारताकडून सहभाग घेतला होता. त्यानंतर थेट आता परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा हा दौरा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan former prime minister nawaz sharif says pm narendra modi could come for the sco meet kvg