२६/११ चा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पुन्हा अटक केली पाहिजे अशी इतकेच नाही तर पाकिस्तानने २६/११ च्या हल्ल्यांसाठी हाफिजला शिक्षा केली पाहिजे अशी मागणी भारताने नाही तर अमेरिकेने केली आहे. हाफिज सईदला मोकळेपणाने फिरू देणे चांगले नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या बाबतीत गंभीर नाही हेच हाफिजच्या सईदच्या सुटकेवरून दिसते असेही अमेरिकेने म्हटले आहे.
जानेवारी २०१६ पासून हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्याला नजरकैदेतून मुक्त करण्यात आले. त्यानंतर हाफिज सईदच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. १० महिने मला नजरकैदेत ठेवण्यात आले. मला काश्मीरबाबत बोलू दिले नाही. मात्र मी काश्मीरमधील लोकांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि लढत राहणार अशी प्रतिक्रिया हाफिज सईदने दिली आहे. मात्र अमेरिका या सुटकेमुळे प्रचंड संतापली आहे. भारताची बाजू उचलून धरत अमेरिकेने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.
लश्कर-ए-तोयबाही ही देखील हाफिज सईदचीच संघटना आहे. या लश्कर ए तोयबामुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये अमेरिकेच्या नागरिकांचाही समावेश होता. त्याचमुळे या हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या हाफिज सईदले मोकळेपणाने सोडणे चांगले नाही त्याला पुन्हा अटक केली पाहिजे. त्याच्या गुन्ह्यांबाबत त्याला कठोरात कठोर शिक्षाही सुनावली पाहिजे, अशी मागणी अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते हेथर नॉर्ट यांनी केली आहे. अमेरिकेने हाफिजला २००८ साली आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.