भारताच्या अंतर्गत भागाला लक्ष्य करू शकण्याची क्षमता असलेल्या १,३०० कि.मी पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्रवाहू ‘हत्फ-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पाकिस्तानने बुधवारी केली. या क्षेपणास्त्राची निर्मिती ही देशाच्या युद्धक्षमतेमध्ये विस्तार करण्याच्या हेतूने करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली. मात्र ही चाचणी कोठे घेण्यात आली, याचा तपशील देण्यात आला नाही. ‘हत्फ-५’ किंवा घोरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्रे अण्वस्त्र तसेच इतर पारंपरिक युद्ध साधनांना १,३०० कि.मी पल्ल्यापर्यंत वाहून नेऊ शकते. या चाचणीमुळे पाकिस्तानच्या युद्धक्षमतेत आणि राष्ट्रीय सुरक्षेमध्ये वाढ झाली असल्याचे, लष्कराने निवेदनामध्ये म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान राजा परवेझ अर्शफ यांनी चाचणीच्या यशस्वीतेबद्दल लष्कराचे अभिनंदन केले.
अण्वस्त्रसज्ज पाक
भारताने अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्यानंतर आठवडय़ाभरातच पाकिस्तानकडून नव्या क्षेपणास्त्राची चाचणी होणे ठरलेले वृत्त आहे. गेल्या शुक्रवारी भारताने स्वदेशी बनावटीच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र संरक्षण कवचाची चाचणी घेतली. त्यानंतर पाकिस्ताने शिरस्ता पाळत अण्वस्रवाहू ‘हत्फ-५’ क्षेपणास्त्रांची चाचणी केली. ६० कि.मी पल्ला गाठणाऱ्या हत्फ-९ ते हत्फ- ४ या मालिकेतील क्षेपणास्त्रे पाकिस्तानकडे आहेत.