पाकिस्तानी सैन्याने सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सांबा व कथुआ जिल्ह्य़ात जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. भारतीय सुरक्षा दलांनीही पाकच्या या कुरापतींना जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमाभागातील ५७ गावांतील पाच हजार लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.
पाकिस्तानी लष्कराने सोमवारी पहाटे पुन्हा एकदा सांबा व कथुआ जिल्ह्य़ांना लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तोफगोळ्यांचा मारा केला. यातील खोरा येथील चौकीवर तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा जवान दविंदर कुमार शहीद झाला. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद, तर एक महिला ठार झाली होती. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी रेंजर्सचे पाच जवान ठार झाले होते. त्यानंतर मात्र पाकिस्तानकडून गोळीबार झाला नव्हता. मात्र एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा एकदा पाकिस्तानने पहाटे दोनपासून जोरदार तोफांचा मारा केला. हा मारा एवढा तीव्र होता, की भारतीय हद्दीतील गावांमध्ये तीन ते चार किमी परिसरापर्यंत तोफगोळे पडत होते. सीमा सुरक्षा दलांनीही या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, परिसरातील पाच हजार रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे, तर साडेतीन हजार लोक स्थलांतरित झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा