इराणने मंगळवारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्याविरोधात पाकिस्तानने इराणला युद्धाचा इशारा दिला होता. तसंच, इराणने हद्दीचे उल्लंघन करून कुरापत काढली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली होती. आता पाकिस्तानने इराणवर प्रतिहल्ला केला आहे. त्यामुळे, हमास-इस्रायल युद्धानंतर आता पाकिस्तान-इराण यांच्यात युद्ध पेटणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आणि इराणमधील आपल्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावले. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांतील नियोजित द्विपक्षीय कार्यक्रम आणि दौरेही त्वरित रद्द केले.
पाकिस्तानच्या दाव्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. जैश-अल-उदल ही इराण आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेली दहशतवादी संघटना असून २०२१ मध्ये या दहशतवादी गटाची स्थापना झाली.
हेही वाचा >> “देश संरक्षणार्थ…”, इराणने पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्यावरून भारताने स्पष्ट केली भूमिका!
दरम्यान, पाकिस्ताननेही आता इराणवर हल्ला केला असून इराणच्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर लक्ष्य केलं आहे. इराणस्थित सरमाचार या दहशतवादी संघटनेच्या तळावर पाकिस्तानने हल्ला चढवला. या हल्ल्यात सात दहशतावादी ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन सादर केलं आहे. त्यानुसार, इराणच्या सरमाचार या दहशतवादी संघटनेवर केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतावदी मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. हा हल्ला म्हणडे इंटेलिजेंस-आधारित ऑपरेशन असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निवेदन
इराणमध्ये सरमाचार या दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याबद्दल पाकिस्तानने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानने या दहशतवाद्यांची उपस्थिती आणि कारवायांचे ठोस पुरावे असलेले अनेक डॉसियरही शेअर केले आहेत. परंतु, आमच्या पुराव्यांवर कारवाई न झाल्याने सरमाचार दहशतवादी निर्दोष पाकिस्तानी नागरिकांचे रक्त सांडत राहिले. त्यामुळे आज सकाळची कारवाई करण्यात आली आहे. ही कृती सर्व धोक्यांपासून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या पाकिस्तानच्या दृढ संकल्पाचा प्रयत्न आहे. या अत्यंत गुंतागुंतीच्या ऑपरेशनची यशस्वी अंमलबजावणी ही पाकिस्तानी सशस्त्र दलांच्या प्रयत्नांची साक्ष आहे. पाकिस्तान आपल्या लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा पाकिस्तान पूर्ण आदर करतो. आजच्या कृतीचा एकमेव उद्देश पाकिस्तानची स्वतःची सुरक्षा आणि राष्ट्रीय हित जोपासणे हे आहे. याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक जबाबदार सदस्य म्हणून, पाकिस्तान सदस्य राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वासह UN चार्टरची तत्त्वे आणि उद्दिष्टे यांचे समर्थन करतो. या तत्त्वांद्वारे मार्गदर्शित आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातील आमच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करताना, पाकिस्तान कोणत्याही सबबी किंवा परिस्थितीत, त्याच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला कधीही आव्हान देऊ देणार नाही”, असा इशाराही पाकिस्तानने दिला आहे.
“इराण हा बंधू देश आहे आणि पाकिस्तानच्या लोकांना इराणी लोकांबद्दल खूप आदर आणि आपुलकी आहे. दहशतवादाच्या धोक्यासह सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही नेहमीच संवाद आणि सहकार्यावर भर दिला आहे आणि संयुक्त उपाय शोधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू”, असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.