अस्ताना (कझाकस्तान) : पाकिस्तान हे जागतिक दहशतवादाचे केंद्र असून भारतातील अतिरेकी कारवायांना तिथूनच खतपाणी मिळते, अशा शब्दांत परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी ठणकावले. भारताला पाकिस्तानसह सर्व शेजाऱ्यांसोबत शांतता हवी आहे, मात्र त्यासाठी पाकिस्तानने तसे वातावरण तयार केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

येथे सुरू असलेल्या ‘आशियामधील समन्वय आणि परस्पर विश्वास वाढ’ (सीआयसीए) या विषयावरील सहाव्या परिषदेत लेखी बोलत होत्या. त्यांच्या आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला. काश्मीरमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शरीफ यांनी केला. त्याला चोख प्रत्युत्तर देताना लेखी म्हणाल्या, ‘‘शरीफ यांचे हे विधान भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ आहे. पाकिस्तानला याचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तानने तिथल्या नागरिकांसाठी काही केले नाही. मात्र आपले सर्व स्रोत हे दहशतवादाच्या विकासासाठी खर्च केले.’’

Story img Loader