अणवस्त्रधारी पाकिस्तान ही जगासमोरील गंभीर समस्या असल्याचे विधान रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. पाकिस्तानने देशांतर्गत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याची गरज असल्याचेही यावेळी ट्रम्प यांनी सांगितले. पाकिस्तान हा देश खूपच गंभीर समस्या आहे, कारण त्यांच्याकडे अणवस्त्रे आहेत. त्यामुळेच पाकिस्तानने देशातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी लाहोरमध्ये झालेल्या स्फोटासंदर्भातही भाष्य केले. याठिकाणी ख्रिश्चन लोकांना लक्ष्य करण्यासाठी उद्यानात आत्मघातकी स्फोट करण्यात आला होता. यामध्ये ६९ जण ठार तर ३०० हून अधिक जखमी झाले होते. ही घटना खरोखरच भयंकर आहे. याठिकाणी मी मुलगामी इस्लामी दहशतवादाबद्दल बोलत आहे. इतर कोणापेक्षाही मी हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले.