पाकिस्तान हा भारताला लहान भावासारखा असल्याचे स्पष्ट करतानाच या शेजारील राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध सुधारल्यास हे दोनही देश महासत्ता होऊ शकतील, असे समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी येथे सांगितले. पाकिस्तान हा आम्हाला लहान भावाप्रमाणे आहे. आम्ही एकमेकांबरोबर राहिल्यास जगात महासत्ता म्हणून उदयास येऊ शकतो व असे झाल्यास कोणीही आम्हाला आव्हान देऊ शकणार नाही, असे एका खासगी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात बोलताना यादव म्हणाले.
केंद्रातील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार उभय देशांतील संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न करीत नाहीत, असा आरोप करताना चीनच्या दुटप्पी कारवायांपुढे हे सरकार डोळेझाक करीत असून पाकिस्तानच्या कमकुवतपणावर मात्र लक्ष केंद्रित करण्यावर भर देत आहे, असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव व कॅबिनेट मंत्री आझम खान यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. शिक्षण, रोजगार आणि ऊर्जा हीच जीवनात यश प्राप्त करण्यासाठी गुरूकिल्ली आहे, असे अखिलेश यादव या वेळी म्हणाले. राज्यात पायाभूत क्षेत्रात अधिक सुधारणा करण्याचा सरकारचा विचार असून गुंतवणूकदारांच्या साहाय्याने हे प्रकल्प मार्गी लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी अलाहाबाद रेल्वे स्थानक दुर्घटनेबद्दल राज्य सरकारला जबाबदार धरण्याचा मुद्दा आपल्या भाषणात खोडून काढला. कुंभमेळ्याहून महास्नान करून परतलेल्या भाविकांची अलाहाबाद रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी झाली. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. हा भाग राज्य सरकारच्या अमलाखाली येत नसल्याने त्याची जबाबदारी सरकारवर कशी काय येऊ शकते, असा सवालही त्यांनी केला.

Story img Loader