पीटीआय, इस्लामाबाद
काश्मीरसह विविध ‘ज्वलंत’ प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ‘प्रामाणिक’ आणि ‘गांभीर्या’ने चर्चेस तयार असल्याचे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंगळवारी केले. भारताबरोबरील तीन युद्धांतून आम्हाला धडा मिळाल्याचे नमूद करत शरीफ यांनी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली.
दुबईस्थित ‘अल अरेबिया’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शाहबाज यांनी काश्मीरसह विविध मुद्यांवर भाष्य केले. काश्मीर प्रश्न आणि पाकपुरस्कृत दहशतवादी कारवायांवरून भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.शरीफ या मुलाखतीत म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी संदेश देतो, की काश्मीरसारख्या ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी आपण समोरासमोर बसून गांभीर्याने चर्चा करू. पाकिस्तान आणि भारत हे शेजारी देश असून, त्यांना परस्परांबरोबरच राहायचे आहे. आपण शांततेत राहायचे, प्रगती करायची की, आपापसात भांडून वेळ आणि साधनसंपत्ती वाया घालवायची, हे ठरवणे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आम्ही भारताबरोबर तीन युद्धे लढली आहेत. यामुळे जनतेच्या दु:ख, गरिबी आणि बेरोजगारीत भरच पडली आहे. आम्ही यातून धडा शिकलो असून, आमचे वास्तव प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला शांततेत जगायचे आहे.’’
‘‘आम्हाला गरिबी हटवायची आहे, समृद्धी आणायची आहे. आमच्या जनतेला शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. आम्हाला आमची उत्पन्न व साधनसंपत्ती बॉम्ब आणि दारूगोळय़ावर वाया घालवायची नाही’’, असे शाहबाज शरीफ म्हणाले.दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, याकडे लक्ष वेधून शरीफ यांनी आता युद्ध नको, अशी भूमिका मांडत संवादाची गरज व्यक्त केली. ‘‘पाकिस्तान आणि भारताला संवादासाठी एकत्र आणण्याची महत्त्वाची भूमिका संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) नेतृत्व बजावू शकते’’, असे शरीफ म्हणाले. नवीन कर्ज मिळवणे, द्विपक्षीय सहकार्य आणि व्यापारी संबंध वाढवणे या उद्देशाने शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी आखाती देशाचा दौरा केला होता.
काश्मीरसह भारताबरोबरील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्रयस्थ देशाच्या मध्यस्थीचे स्वागत करेल, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गेल्या आठवडय़ात सांगितले होते. मात्र, या प्रश्नावर कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी चालणार नाही, या भूमिकेवर भारत ठाम आहे.
लष्कर- ए- तैयबाचा उपप्रमुख मक्की जागतिक दहशतवादी
लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानस्थित उपप्रमुख अब्दुल रेहमान मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले. मक्कीला काळय़ा यादीत टाकण्याच्या अमेरिका आणि भारताच्या संयुक्त प्रस्तावास चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील आपली आडकाठी हटवली. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे.