कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात ज्या ठिकाणी लपून बसला होता, त्या ठिकाणाची माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटेनेचे माजी प्रमुख लेफ्ट. जन. अहमद शुजा पाशा यांना होती. तसेच लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद हाही ओसामाच्या नियमितपणे संपर्कात होता, असे न्यूयॉर्क टाइम्सने बुधवारी म्हटले.
वरिष्ठ पत्रकार कालरेट्टा गॉल यांनी न्यूयॉक टाइम्समधील आपल्या लेखात नमूद केले आहे की, जेव्हा अमेरिकेच्या फौजांनी ओसामा लपून बसलेल्या घरावर कारवाई केली. तेव्हा आयएसआय प्रमुख ले.जन. अहमद शुजा पाशा यांनी आबोटाबादमध्ये ओसामा लपून असल्याची माहिती होती, याचे पुरावे अमेरिकेला मिळाल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आपणास सांगितले.
गॉल २००१ ते २०१३ या काळात न्यूयॉर्क टाइम्ससाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील वृत्तांकन करीत होते. त्यामुळे गॉल यांनी ‘व्हॉट पाकिस्तान न्यू अबाउट बिन लादेन’या नावाने लिहिलेल्या लेखात ही बाब मांडली आहे. यासाठी पुढील महिन्यात प्रकाशित होणाऱ्या ‘द रॉंग एनिमी- अमेरिका इन अफगाणिस्तान, २००१-२०१४’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे.
अमेरिकेने ओसामाच्या निवासावर छापा घालून कारवाई केल्यानंतर आयएसआयचे प्रमुख राहिलेल्या पाशा आणि आयएसआयच्या प्रसिद्धी कार्यालयाने आपल्याला याप्रकरणी कोणतीच माहिती नसल्याचे वारंवार सांगितले.
ओसामा बिन लादेनसाठी आयएसआय एक विशेष मोहीम राबवत होती. या मोहिमेअंतर्गत एक अधिकारी स्वतंत्रपणे कार्यरत होता आणि हा अधिकारी याबाबत आपल्या वरिष्ठांनाही काही माहिती देत नसल्याचे पाकिस्तानातील खास सूत्रांनी स्पष्ट केल्याचेही गॉल यांनी नमूद केले आहे.
‘डॉक्टर शकील आफ्रिदीची सुटका करा’
वॉशिंग्टन : अल्-काइदाचा सर्वेसर्वा ओसामा बिन लादेन याला शोधून काढण्यासाठी सीआयएला मदत करणारे डॉक्टर शकील आफ्रिदी यांच्या सुटकेच्या मागणीचा अमेरिकेने पुनरुच्चार केला आहे. आफ्रिदी यांच्या तुरुंगवासाचा अवधी कमी करण्याच्या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. डॉ. आफ्रिदी यांना अटक करण्यात आल्याबद्दल चिंताच वाटत असून, त्यांना ठोठावण्यात आलेली ३३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा २३ वर्षांवर कमी करण्यात आल्याचे पाऊल सकारात्मक आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या डेन पास्की यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले. अर्थात असे असले, तरी डॉ. आफ्रिदी यांना प्रथम अटक केल्यापासूनच आम्ही प्रयत्न सुरू ठेवले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. ओसामा बिन लादेन याला अमेरिकी फौजांनी ठार मारल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, २ मे रोजी अटक करून पाकिस्तानने त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. लष्कर-ए-इस्लाम या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी आफ्रिदी यांचे लागेबांधे असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अमेरिकेने थेट कारवाई केल्यामुळे पाकिस्तानचे शक्तिशाली लष्कर कमालीचे अडचणीत आले होते. डॉ. आफ्रिदी सध्या पेशावर येथील तुरुंगात आहेत. लादेनच्या कुटुंबीयांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डॉ. आफ्रिदी यांनी बनावट लसीकरण मोहीम राबविली होती, असेही सांगण्यात येते. मात्र कायदेतज्ज्ञ व मानवी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आफ्रिदी यांच्या शिक्षेस आव्हान दिले आहे.आफ्रिदी यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेवर पाकिस्तानी लवादाने गेल्याच आठवडय़ात शिक्कामोर्तब केले. मात्र त्यांच्या शिक्षेचा कालावधी १० वर्षांनी कमी केला.