तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकेचा भडीमार केलाय. इम्रान खान हे एखाद्या कळसुत्री बाहुल्याप्रमाणे असून त्यांना पाकिस्तानच्या लोकांनी निवडून दिलेलं नाही असा टोला तालिबानने लागवला आहे. फ्रायडे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तालिबानने पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये अती रस न घेण्याचा खोचक सल्ला दिला आहे.

टीकेचं कारण काय?

“इम्रान खान यांनाही निवडलेले आणि कळसुत्री बाहुला असं म्हटलं जातं. आमच्या देशातील अंतर्गत गोष्टींमध्ये कोणी ढवळाढवळ करावी अशी आमचे इच्छा आहे. ज्याप्रकारे आम्ही इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालत नाही त्याचप्रमाणे त्यांनाही रहावं,” असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी पाकिस्तानला इशारा देताना म्हटलंय. बुधवारी इम्रान यांनी एका मुलाखतीमध्ये अफगाणिस्तान कळसुत्री बाहुल्याप्रमाणे सरकार असेल तर फार काट तग धरु शकणार नाही असं म्हटलं होतं. त्यावरुनच आता तालिबानने इम्रान खान यांना टोला लगावला आहे.

पाकिस्तानमधील समस्यांकडे आधी बघा…

मुलाखतीमध्ये इम्रान यांनी केलेल्या या टीकेला अनुसरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “तुम्ही इम्रान खान यांच्याबद्दल बोलत आहात का. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारची मागणी केली होती ते? खरं तर पाकिस्तानमध्येच फार समस्या आहेत. त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. इम्रान खान हे स्वत: निवडून आलेले नेते नाहीयत हे लक्षात घ्यायला हवं. ते काही पाकिस्तानी लोकांच्या मर्जीने पंतप्रधान झालेले नाहीत,” असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानवर साधला निशाणा

“सध्या पाकिस्तानमधील जनता इम्रान खास सरकार हे पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुला असल्याचं म्हण आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांबरोबरच सर्वसामन्यांना त्यांचे मूलभूत हक्कही दिले जात नाहीत. पाकिस्तानमधील जनता सध्या तेथील सरकारच्या कामावर समाधानी नाहीय. त्यामुळे त्यांना लष्कराच्या हातातील सरकार असं म्हटलं जातंय,” अशा शब्दात तालिबानने इम्रान खान सरकारच्या कारभारावर टीका केलीय. “सविस्तरपणे विचार केला तर लोकांची ही टीका योग्य आणि खरी आहे. मात्र असं असलं तरी एक अफगाणिस्तानी नागरिक म्हणून मला इम्रान खान यांना कळसुत्री बाहुला म्हणण्याचा हक्क नाहीय. आम्ही कधीच त्यांच्या देशांतर्गत विषयांबद्दल बोलण्याचा किंवा मला त्यांचं सरकार आवडत नाही असं मत अफगाणिस्तानकडून बोलताना मांडत नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. त्यांनीही हे अफगाणिस्तान सरकार आम्हाला आवडत नाही किंवा त्यांनी सर्वसमावेशक असावं असं बोलणं बंद केलं पाहिजे” असं तालिबानने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

कोणी काहीही बोलायची गरज नाही

“आम्ही कसं सरकार चालवतो याबद्दल कोणीच काहीही बोलू नये. हे मुल्लांचं सरकार आहे, हे हिंसक लोकांचं सरकार आहे किंवा हे पगड्या घालणाऱ्यांचं सरकार आहे यापैकी कोणतंही वक्तव्य कोणीही करु नये. आम्हाला आमच्या सरकारी कारभारामध्ये परराष्ट्रांमधील ढवळाढवळ मान्य नाही,” असं तालिबानने थेटपणे सांगितलं आहे.

आपल्या देशात काय सुरु आहे ते पाहा…

“प्रत्येकाने आपआपल्या देशावर लक्ष केंद्रीत करावं. त्यांच्या देशातील लोकांना जाणवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी काम करावं. पाकिस्तानमध्ये तर किती साऱ्या समस्या आहेत, मात्र आम्ही कधी त्याबद्दल बोलेलो नाही किंवा काही सल्लाही दिला नाहीय. आम्ही त्यांच्या सर्वभौमत्वाचा आदर करतो म्हणून आम्ही त्यात पडत नाही. पाकिस्ताननेही आमच्या सर्वभौमत्वाचा आदर करावा इतकी माफक अपेक्षा आमची आहे,” असं तालिबानने स्पष्ट केलं आहे.

थेट धमकी वजा इशारा…

मुलाखतीच्या शेवटी तालिबानने पाकिस्तानचं थेट नाव न घेता धमकी वजा इशारा दिलाय. “जे आमचा आदर करतील त्यांच्याविरोधात आम्ही काहीही करणार नाही. मात्र ज्यांना आमच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करण्याची इच्छा असेल त्यांना आम्ही सांगू इच्छितो की असं झाल्यास आम्हालाही तुमच्या (देशातील) अंतर्गत प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करण्याचा हक्क आहे,” असं तालिबानने स्पष्ट केलंय.

Story img Loader