Pakistan former PM Imran Khan: कारागृहात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांनी आपल्या समर्थकांना पेशावर शहरात १३ डिसेंबर रोजी जमण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना कायदेभंग चळवळ सुरू करण्याची सूचना दिली आहे. इम्रान खान यांच्या एक्स हँडलवर सदर निवेदन पोस्ट करण्यात आले आहे. इम्रान खान यांचा निरोप असे सांगून पुढे म्हटले की, १३ डिसेंबर रोजी खैबर पैख्तुनवा प्रांताची राजधानी पेशावर येथे जमा होण्यास सांगितले आहे. या प्रांतावर इम्रान खान यांच्या पीटीआय (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) पक्षाचे प्राबल्य आहे.
२५ नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद येथे काढलेल्या निषेध मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारकडून बळाचा वापर केला गेला. याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मोर्चाला पांगवण्यासाठी झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मागच्या वर्षी ९ मे रोजी झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच पीटीआय पक्षाच्या अटक केलेल्या नेत्यांना सोडण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
हे वाचा >> पाकिस्तान का पेटलंय? इम्रान खान समर्थक आणि लष्करातील रक्तरंजित संघर्षाचे कारण काय?
या दोन मागण्या पूर्ण न झाल्यास १४ डिसेंबर पासून पाकिस्तानमध्ये कायदेभंग आंदोलन सुरू करण्यात येईल आणि पुढील परिणामांसाठी सरकार पूर्णपणे जबाबदार असेल असाही इशारा इम्रान खान यांनी दिला. दरम्यान सरकारने मात्र २५ नोव्हेंबरच्या मोर्चात कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच मागच्या वर्षी ९ मे रोजी पीटीआयच्या समर्थकांनी लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले केले होते, असे सरकारकडून सांगण्यात आले. गुरुवारी सरकारने ९ मे रोजीच्या हिंसाचाराबाबत त्यांना दोषी मानले आहे. मात्र इम्रान खान यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, माजी क्रिकेटपटू ७२ वर्षीय इम्रान खान मागच्या वर्षीपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर डझनभर खटले दाखल झाले आहेत, त्यामध्ये गुरुवारी एका नव्या आरोपीची भर पडली. २०२२ रोजी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर इम्रान खान यांनी राजकारणातून बाहेर पडावे, यासाठी लष्कराने खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाने केला आहे. दुसरीकडे लष्कराने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.