राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत; मंगळवारी पठाणकोटला भेट देणार
पठाणकोट हवाई तळावर जानेवारीत झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असलेले पाकिस्तानचे पाच सदस्यांचे संयुक्त तपास पथक (जेआयटी) शनिवारी येथे येऊन पोहोचले. एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरिता पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पाकिस्तानहून एका विशेष विमानाने आलेल्या या पथकाचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी स्वागत केले. हे पथक मंगळवारी पठाणकोटला भेट देणार असून एनआयएने आतापर्यंत केलेल्या तपासाचे विश्लेषणही करणार आहे.
पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप असून त्यात सुरक्षा दलाचे ७ कर्मचारी मारले गेले होते. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यासंबंधीच्या खटल्यातील काही साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यासाठी पाकिस्तानने त्या वेळी एक न्यायालयीन आयोग भारतात पाठवला होता.
पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाचे (सीटीडी) प्रमुख व अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक मोहम्मद ताहीर राय यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांच्या या पथकात लाहोर येथील गुप्तचर विभागाचे उपमहासंचालक मोहम्मद अझीम अर्शद, आयएसआयचे अधिकारी लेफ्टनंट कर्नल तन्वीर अहमद, लष्करी गुप्तचर विभागाचे ले.क. इरफान मिर्झा आणि गुजरानवाला येथील सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तन्वीर यांचा समावेश आहे.
हे पथक सोमवारी सकाळी एनआयएच्या मुख्यालयात जाणार असून तेथे एनआयएचा चमू त्यांना आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत ९० मिनिटांचे सादरीकरण, तसेच हा हल्ला सीमेपलीकडील पाकिस्तानातून झाला असल्याचे दाखवणारे पुरावे देईल. त्यानंतर पाकिस्तानी पथकाला काही शंका असल्यास त्याबाबत ते तपासकर्त्यांना प्रश्न विचारतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी हे पथक पठाणकोटला जाईल. त्यांना फक्त दहशतवादी व सुरक्षा दलांची चकमक झालेला भाग दाखवण्यात येणार असून, महत्त्वाचे भाग दिसू नयेत म्हणून ते झाकून ठेवण्यात येणार आहेत. शिवाय प्रत्यक्षदर्शीपैकी नॅशनल सिक्युरिटी गार्ड किंवा बीएसएफच्या कर्मचाऱ्यांची त्यांना विचारपूस करता येणार नाही.
पाकिस्तानही भारतीय चमूला नंतर पाकिस्तानला जाण्यास परवानगी देईल अशा परस्पर देवाणघेवाणीच्या तत्त्वावर भारत याप्रकरणी पाकिस्तानला सहकार्य करत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
पाकचे तपास पथक भारतात
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून स्वागत; मंगळवारी पठाणकोटला भेट देणार
First published on: 28-03-2016 at 02:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan joint investigation team arrives in india to visit pathankot base tuesday