पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींचे भारतात पडसाद उमटताना पाहायला मिळत असतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान खान यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेली अटक हा मुद्दाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा ठरला होता. भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांना १० वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली. मात्र, त्याच्याच पुढच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. यासंदर्भात आता संयुक्त राष्ट्राने यासंदर्भात पाकिस्तान सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडतंय पाकिस्तानमध्ये?

पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात इम्रान खान यांच्या अटकेनंतर राजकीय तणाव निर्माण झाला आहे. चार ते पाच महिने तुरुंगात काढल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा प्रकार म्हणजे त्यांच्याविरोधातील कारस्थानाचा भाग असल्याचा ठपका संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानवर ठेवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार गटाकडून सोमवारी एक निवेदन जारी करण्यात आला असून त्यात इम्रान खान यांच्या अटकेचा उल्लेख आहे.

“इम्रान खान यांची अटक हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. त्यावरचं योग्य पाऊल म्हणजे त्यांची तातडीने सुटका करणं हे आहे. तसेच, त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लागू असणारी नुकसान भरपाईही दिली जावी”, असं संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

“हा व्यापक कारस्थानाचा भाग”

इम्रान खान यांना तातडीने सोडण्याची मागणी संयुक्त राष्ट्राकडून करण्यात आलेली असताना दुसरीकडे ही कारवाई म्हणजे इम्रान खान यांच्याविरोधातील व्यापक कारस्थानाचा भाग असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. “इम्रान खान यांना सहन करावा लागलेला कायदेशीर कारवाईचा मनस्ताप म्हणजे त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाविरोधात चालवण्यात आलेल्या व्यापक अपप्रचार मोहिमेचाच भाग आहे”, असंही या गटानं आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.

“पाकिस्तानात २०२४ च्या निवडणुका होऊ घातलेल्या असताना त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आलं, त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांच्या प्रचारसभांमध्ये गोंधळ घालण्यात आला. निवडणुकीच्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले असून अनेक मतदारसंघांमधल्या निकालांवर त्याचा परिणाम झाला आहे”, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

पाकिस्तानकडून अद्याप उत्तर नाही

दरम्यान, अमेरिकेतली पाकिस्तानी दूतावासाकडून अद्याप या निवेदनासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका जारी करण्यात आलेली नाही. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानमधील केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांचा तुरुंगवास, सिफर प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा

इम्रान खान यांनी २०१८ साली केलेला विवाह कायद्याला धरून नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यान्वयेही खटला चालवण्यात येत आहे. त्याशिवाय, त्यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचाही आरोप आहे. गेल्या काही महिन्यांत इम्रान खान यांना यातील काही खटल्यांमध्ये सुनावण्यात आलेली शिक्षा न्यायालयाकडून रद्द ठरवण्यात आली आहे. त्यात मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीसंदर्भातील प्रकरणाचाही समावश आहे. मात्र, त्यानंतरही इतर खटल्यांमध्ये इम्रान खान यांचा तुरुंगवास अद्याप कायम आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan latest news un humen rights group slams imran khan illegal detention pmw