Pakistan Suspends Trade with India : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारताने अटारी सीमा बंद केली आहे. त्यामुळे उभय देशांमधील उरलासुरला व्यापार व्यवहार संपुष्टात आला आहे. पाकिस्ताननेही भारताबरोबरचे व्यापारी संबंध स्थगित केले आहेत. मात्र, याचा पाकिस्तानलाच मोठा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच भितीने पाकिस्तानने तिथल्या जनतेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानी सरकारने देशात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
भारताने सिंदू जलकरार स्थगित केल्यानंतर इस्लामाबादने नवी दिल्लीबरोबरचा व्यापार स्थगित केला आहे. त्यानंतर काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने त्यांच्या औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तिथल्या औषध नियामक प्राधिकरणाने म्हणजेच डीआरएपीने आपत्कालीन योजना तयार केली आहे. डीआरएपीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं जिओ न्यूजने म्हटलं आहे की २०१९ मधील संकटानंतर पाकिस्तानने अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. देशातील औषधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले आहेत.
पाकिस्तानमधील औषध उद्योग भारतावर अवलंबून?
पाकिस्तानातील औषध उद्योग हा काही अंशी भारतातील कच्च्या मालावर अवलंबून आहे. तिथल्या औषध उत्पादक कंपन्या ३० ते ४० टक्के कच्चा माल भारताकडून आयात करतात. पाकिस्तान आता चीन, रशिया व अनेक युरोपीय देशांकडून पर्यायी स्त्रोत शोध आहे. जेणेकरून पाकिस्तानमधील औषधांची गरज पूर्ण होईल व औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही. प्रामुख्याने रेबीजविरोधी लस, सर्पदंशानंतर दिलं जाणारं औषध (वेनोम), कर्करोगावरील औषधे, मोनोक्लोनल अँटीबॉडीज व इतर महत्त्वपूर्ण जैविक उत्पादनांसाठी पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे.
भारताबरोबरचा व्यापार थांबवल्याने पाकिस्तानला प्रतिकूल परिणामांचा सामना करावा लागेल
डीआरएपीने म्हटलं आहे की पाकिस्तानचा आरोग्य विभाग कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो. मात्र औषध उद्योगातील सूत्रांनी व आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की भारताबरोबरचा व्यापार थांबवल्याने आपल्याला प्रतिकूल परिणामांचा सामना करावा लागू शकतो. पाकिस्तानी सरकारने व्यापार स्थगित करण्याची घोषण केल्यानंतरही पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाला औषधांच्या आयातीची स्थिती स्पष्ट करण्याचे अधिकृत आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानच्या आरोग्य विभागाला व औषध उद्योगाला भिती आहे की पुरवठा साखळीत भारतामुळे येणाऱ्या या व्यत्ययामुळे औषधांची गंभीर टंचाई निर्माण होऊ शकते.