पाकव्याप्त काश्मीरमध्ये शुक्रवारी ११ परदेशी नागरिकांना घेऊन जाणारे पाकिस्तानच्या लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत फिलिपाइन्स आणि नॉर्वेच्या राजदूतांसह एकूण सहा जण ठार झाले. मात्र, हे हेलिकॉप्टर पाडल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली असून पंतप्रधान नवाझ शरीफ हे आमचे लक्ष्य होते, असे तालिबानने जाहीर केल्याने खळबळ माजली आहे.
तालिबानकडून हा खळबळजनक दावा करण्यात आला असला तरी पाकिस्तानच्या लष्कराने त्याचे जोरदार खंडन केले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगित-बाल्टिस्तान क्षेत्रात सदर हेलिकॉप्टर दहशतवादी अथवा फुटीरतावादी शक्तींनी पाडल्याचे लष्कराने अमान्य केले. सदर हेलिकॉप्टर कोसळताना त्याने पेट घेतला आणि ते एका शाळेवर कोसळले त्या वेळी शाळेत विद्यार्थी होते.
एमआय-१७ जातीच्या या हेलिकॉप्टरमध्ये पाकिस्तानचे सहा आणि ११ परदेशी नागरिक होते. हेलिकॉप्टर तातडीने उतरविण्यात येत असताना ते नल्तार खोऱ्याजवळ एका शाळेवर कोसळले. त्यामुळे शाळेच्या इमारतीने पेट घेतला, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
या दुर्घटनेत फिलिपाइन्सचे राजदूत डॉमिंगो ल्युसेनारिओ आणि नॉर्वेचे राजदूत लेफ लार्सन, मलेशिया आणि इंडोनेशियाच्या राजदूतांच्या पत्नी आणि दोन वैमानिक ठार झाले, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. या दुर्घटनेत पोलंडचे राजदूत अ‍ॅण्ड्रेज अनानिकझॉलीश आणि  डच राजदूत मार्सेल डी विंक हे जखमी झाले आहेत.
विमानविरोधी क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडण्यात आले त्यामध्ये वैमानिक आणि अनेक परदेशी राजदूत ठार झाल्याचा दावा तालिबानचा मुख्य प्रवक्ता मोहम्मद खोरासनी याने केला आहे. तालिबानच्या एका विशेष गटाने शरीफ यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती, मात्र ते अन्य हेलिकॉप्टरमध्ये असल्याने बचावले, असेही खोरासनी याने म्हटले आहे.दरम्यान, तालिबानच्या दाव्याचे प्रवक्त्याने खंडन केले असून हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे कोसळले असल्याचे म्हटले आहे. दोन हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरविण्यात आली, मात्र तिसरे कोसळले आणि त्याने पेट घेतला. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली
आहे.
नवाझ शरीफ लक्ष्य  ..
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान येथे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी अनेक राजकीय मुत्सद्दय़ांना तीन हेलिकॉप्टरद्वारे तेथे नेण्यात येत होते. त्यापैकी एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने केला असून नवाझ शरीफ हे आमचे लक्ष्य होते, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा