भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांत विविध दहशतवादी गटांना पाकिस्तानचा पाठिंबा अधोरेखित केला. तसेच, ‘दहशतवादाचे केंद्र’ असं पाकिस्तानचे नाव घेता वर्णन केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदींवर वैयक्तिक टीप्पणी केली होती. त्यातच आता पाकिस्तानच्या मंत्री शाझिया मेरी यांनी भारताला ‘अण्वस्त्र हल्ल्या’ची धमकी दिली आहे.
पाकिस्तानला ‘दहशतवादाचे केंद्र’ म्हटल्यावर संतप्त झालेल्या ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’च्या नेत्या आणि मंत्री शाझिया मेरी यांनी शनिवार पत्रकारांनी संवाद साधत भारतावर टीका केली. “पाकिस्तानवर सातत्याने आरोप केले तर गप्प बसणार नाही. भारताने विसरू नये की पाकिस्तानजवळ अणुबॉम्ब आहे. आमच्याकडील अणुबॉम्ब गप्प राहण्यासाठी नाही आहे. गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा शाझिया मेरी यांनी दिला.
हेही वाचा : बिलावल भुट्टोंची मोदींवरील टीका ही पाकिस्तानची नीचतम पातळी
शाझिया मेरी यांनी पंतप्रधान मोदींवरही हल्लाबोल केला आहे. “भारताचे पंतप्रधान देशात केवळ द्वेष पसवत आहेत. मोदी सरकारमध्ये हिंदुत्वाचा उदय झाला आहे. तर, भारत मुस्लीमांना दहशतवादाशी जोडते, हा त्यांच्या प्रचाराचा भाग आहे,” असे प्रत्युत्तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना शाझिया मेरी यांनी दिलं आहे.
बिलावल भुट्टो काय म्हणाले होते?
“मला भारताला सांगायचं आहे की ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला आहे, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. त्यांच्यावर (नरेंद्र मोदी) पंतप्रधान होईपर्यंत देशात प्रवेश करण्यावर बंदी होती. हे आरएसएसचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. आरएसएस काय आहे? ते हिटलरकडून प्रेरणा घेतात”, अशी टीका भुट्टो यांनी केली होती.