पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित झालेला आहे. संयुक्त राष्ट्रानेही मागील महिन्यात अल्पसंख्याक समाजातील महिला आणि मुलींचे रक्षण करण्यात पाकिस्तान सरकार कमी पडत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या संसदेत एका हिंदू खासदाराने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानच्या काही प्रांतामध्ये स्थानिक गुंड आणि समाजकंटकाकडून हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर होत असल्याचा मुद्दा खासदार दानेश कुमार पलायानी यांनी उपस्थित केला. तसेच पाकिस्तानचे संविधान आणि कुराण कुणाचाही धर्म बदलण्याचे अधिकार देत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार दानेश कुमार पलायानी पुढे म्हणाले, “सिंद प्रांतात हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मुली या लुटीचा माल नाहीत की, कुणीही त्यांचे धर्मांतर करेल. दोन वर्षांपूर्वी प्रिया कुमारी नावाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. दोन वर्षांपासून सरकारने आरोपींविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. काही गुंड आणि दरोडेखोर आपल्या देशाचे (पाकिस्तान) नाव धुळीस मिळवत आहेत. पाकिस्तानचे संविधान आणि कुराणदेखील कुणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्याची परवानगी देत नाही.”

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार निवडणूक; कोण आहेत डॉ. सवेरा प्रकाश?

पलायानी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

महिन्याभरापूर्वीच संयुक्त राष्ट्रांमधील तज्ज्ञांनी पाकिस्तानमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. “पाकिस्तानमधील ख्रिश्चन आणि हिंदू मुली मोठ्या प्रमाणात अत्याचारास बळी पडत आहेत. त्यांचे बळजबरीने धर्मांतर केले जाते, अपहरण, मानवी तस्करी, बालविवाह आणि लैंगिक अत्याचारासारखे गुन्हे त्यांच्याबाबतीत होत आहेत”, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी दिला होता. अल्पसंख्याकांच्या मानवी अधिकारांचे होणारे उल्लंघन आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला सहन केले जाणार नाही असेही संयुक्त राष्ट्रांनी ठणकावले होते.

दानेश कुमार पलायानी यांनी संसदेत ज्या प्रिया कुमारी या मुलीचा उल्लेख केला, ती मुलगी केवळ सहा वर्षांची आहे. या मुलीच्या अपहरणामागे सिंध प्रांतातील एका पुढाऱ्याचा हात असल्याचा संशयही पलायानी व्यक्त केला. पलायानी म्हणाले की, आरोपीला अटक करण्याची सरकारमध्ये धमक नाही, त्यामुळे अल्पसंख्याकांना न्याय मिळत नाही.

बीबीसीने २०१४ साली दिलेल्या एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी अनेक ख्रिश्चन आणि हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात येते. कधी कधी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांचे लग्न लावून देण्यात येते. “पाकिस्तानमध्ये कट्टरतावाद वाढू लागल्यामुळे देशातील १० टक्के अल्पसंख्याकांपुढे जगण्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत”, असेही या अहवालात म्हटले गेले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan minority senator danesh kumar palyani roaring speech on forced religious conversions of hindu girls in sindh kvg