Pakistan National Assembly News: १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. भारताच्या पूर्वेकडे बांग्लादेश नावाच्या देशाचा जन्म झाला. आता तशीच काहीशी स्थिती पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये निर्माण झाल्याचं विधान पाकिस्तानच्या एका खासदारानं थेट देशाच्या संसदेत केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा १९७१ सारखी परिस्थिती पाकिस्तानमध्ये उद्भवेल, संयुक्त राष्ट्र मध्यस्थी करेल आणि पाकिस्तान नमतं घेईल, असं हे खासदार म्हणाले आहेत.
पाकिस्तानच्या संसदेतील एक सदस्य मौलाना फज्ल रेहमान यांनी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदीय अधिवेशनात बोलताना केलेल्या या विधानामुळे पाकिस्तानच्याच नव्हे, तर आशियातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.
काय म्हणाले पाकिस्तानचे खासदार?
खासदार मौलाना फज्ल रेहमान यांनी बलुचिस्तान कधीही स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतो, असं पाकिस्तानच्या संसदेत म्हटलं आहे. “बलुचिस्तान प्रांतातले ५ ते ७ जिल्हे मिळून स्वतंत्र झाल्याची घोषणा करू शकतात. १९७१ साली बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. जर सध्याच्या शासनकर्त्यांची मानसिकता बदलली नाही, तर पुन्हा तीच परिस्थिती आताही उद्भवू शकते”, असं रेहमान म्हणाले.
संयुक्त राष्ट्र आणि पाकिस्तानची भूमिका
दरम्यान, रेहमान यांनी पाकिस्तान सरकारवर टीका करताना संयुक्त राष्ट्रांचाही उल्लेख केला. “जर बलुचिस्तानमधल्या या जिल्ह्यांनी स्वतंत्र झाल्याची घोषणा केली, तर संयुक्त राष्ट्र (UN) लागलीच त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारेल आणि पाकिस्तान या सर्व घडामोडींसमोर नमतं घेईल”, अशा शब्दांत फज्ल रेहमान यांनी पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील आकारमानाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत असून लोकसंख्येच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे. इथे पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त २ टक्के नागरिक राहतात.
बलुचिस्तान प्रांतात वाढता हिंसाचार
दरम्यान, फज्ल रेहमान यांचं हे विधान बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही महिन्यांपासून चालू असणाऱ्या हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलं आहे. या भागातील कुर्रम परिसरात शिया व सुन्नी या दोन समुदायांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून या भागातील शिया विरुद्ध सुन्नी हा वाद सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. नोव्हेंबर २०२४ पासून अर्थात गेल्या चार महिन्यांत या भागातील हिंसाचारात १५० हून अधिक नागरिकांचा हिंसक घटनांमध्ये बळी गेला आहे.