सरबजितसिंग निर्दोष होता आणि निर्दोष माणसाला शिक्षा होत नाही, त्याचा खून केला जातो. या शब्दांत सरबजितची बहिण दलबीर कौर यांनी आपल्या भावना गुरुवारी पत्रकारांकडे व्यक्त केल्या. सरबजितचे बुधवारी रात्री लाहोरमधील रुग्णालयात निधन झाले. सरबजितवर कारागृहातील काही कैद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनीच सरबजितचा खून केल्याचा आरोपही दलबीर कौर यांनी केला.
त्या म्हणाल्या, पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सरबजित निर्दोष होता. त्याच्यावर केवळ भारतीय असल्यामुळेच पाकिस्तानात अत्याचार करण्यात आले. भारतासाठीच तो शहीद झाला. पाकिस्तानने भारताच्या भावनांचा खून केलाय. अशावेळी भारतातील सर्वांना एक व्हायला हवे. सगळ्यांनी मिळून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे हात बळकट करायला हवेत. पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.
कैदेत असताना सरबजितला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या शिबिरामध्ये जाऊन प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याने तसे पत्र मला पाठविले होते, असाही खुलासा दलबीर कौर यांनी केला. बळजबरीने मला दहशतवाद्यांच्या शिबिरामध्ये पाठविले, तर मी तिथेच स्फोट घडवून आणेन, असे सरबजितने मला सांगितले होते, असेही दलबीर कौर म्हणाल्या.