भारत तोडू पाहाणाऱ्यांशी चर्चा करायची की भारत सरकारशी चर्चा करायची, यातली निवड पाकिस्तानला सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून करावीच लागेल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी येथे जागतिक आर्थिक परिषदेत केले. जोवर पाकिस्तान सद्बुद्धीने हा निर्णय करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा अशक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे तसेच उभय देशांतील संबंध सुरळीत व्हावेत, असेही आम्हाला वाटते पण या मार्गात पाकिस्तानच्या बाजूने काही अडथळे आहेत, असेही त्यांनी सांगितले. आम्ही सकारात्मक वातावरण निर्माण केले, आम्ही परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चाही योजली, आमचे परराष्ट्र सचिव पाकिस्तानला जाणारही होते, त्याच्या काही तास आधीच पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांनी फुटीर गटांना चर्चेसाठी बोलावले. तेव्हा आता त्यांना खरेच कोणाशी चर्चा करायची आहे हे त्यांनीच ठरविण्याची वेळ आली आहे, असेही जेटली यांनी नमूद केले.