पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सरकारस्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. आता लवकरच पाकिस्तानमध्ये युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या युतीतील पीएमएल-एन पक्षाने पंतप्रधापदासाठी माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची निवड केली आहे.
शाहबाज शरीफ यांची पंतप्रधापदासाठी निवड
पाकिस्तानच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे चांगलीच पंचाईत झाली होती. मात्र सरकार स्थापनेसाठी नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन या पक्षाने बिलावल भुत्तो-झरदारी यांच्या पीपीपी पक्षाशी बोलणी सुरू केली होती. त्यानंतर आता या दोन्ही पक्षांचे युतीसाठी एकमत झाले आहे. नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पीएमएल-एन पक्षने आश्चर्यकारकरित्या नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांची पंतप्रधापदासाठी निवड केली आहे.
इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी
दुसरीकडे पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सर्वेसर्वा तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी पाठिंबा दिलेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजयी कामगिरी केली. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्या पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. इम्रान खान यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले होते. त्यामुळे पीटीआय पक्षाच्ये उमेदवारांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढावी लागली.
निवडणुकीचा निकाल काय?
पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीत पाकिस्तान पीपल्स पार्टीने एकूण ५३ जागांवर तर पीएमएल-एन पक्षाने ७५ जागांवर विजय मिळवला आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान या पक्षाचा १७ जागांवर विजय झाला आहे. बहुमताचा आकडा पार करण्यासाठी २६५ पैकी १३३ लोकप्रतिनिधींचे समर्थन मिळणे गरजेचे आहे. पीटीआय पक्षाचे समर्थन लाभलेल्या एकूण १०१ अपक्ष उमेदवारांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.