बहुतांश भारतीयांना पाकिस्तानची ओळख ही प्रामुख्याने शत्रुराष्ट्र किंवा दहशतवादाची गंभीर समस्या असलेला शेजारी देश अशीच आहे. मात्र, या दोन्हींच्याही पलीकडे पाकिस्तानमध्ये अनेक समस्या असून त्या आता डोकं वर काढू लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये वेगाने बदल होत असून त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील नागरी आणि आर्थिक समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करू लागल्या आहेत. विशेषत: पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजूनही स्वावलंबी होऊ शकलेली नसून त्याचाच परिणाम इतर क्षेत्रांवर होऊ लागला आहे. आणि हे खुद्द पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनीच मान्य केलं आहे.
मोईद यूसूफ यांनी सोमवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना देशाच्या आर्थिक स्थितीविषयी गंभीर निरीक्षणं मांडली आहेत. तसेच, आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण देखील संकटात सापडल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
“अंतर्गत गरजा भागवण्याची क्षमता नाही”
मोईद युसूफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर बोलताना देश विदेशी आर्थिक मदतीवर अवलंबून असल्याचं सांगितलं. “आमच्याकडे गरजा भागवण्यासाठीची आर्थिक क्षमताच नाही. आणि जोपर्यंत आम्ही आमच्या आर्थिक गरजा देशातच भागवू शकत नाही, तोपर्यंत आमचं विदेशी आर्थिक मदतीवरचं अवलंबित्व कमी होणार नाही”, असं युसूफ म्हणाले आहेत.
परराष्ट्र धोरणावर अमेरिकेचा प्रभाव!
“पाकिस्तानकडे आर्थिक स्वावलंबित्व नाही. त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेच्या प्रभावापासून स्वतंत्र होऊ शकत नाही. जेव्हा आम्ही आमच्या मागण्या देशातच पूर्ण करू शकत नाही, तेव्हा आम्ही विदेशी मदतीचा पर्याय निवडतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे इतर देशांकडून कर्ज घेता, तेव्हा तुमचं आर्थिक सार्वभौमत्व धोक्यात येतं. त्याचा तुमच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम होतो. पाकिसस्तानवर अमेरिकेचा प्रभाव आहेच, पण मला शंका आहे की इतर देश देखील अशाच प्रकारे अमेरिकेच्या प्रभावाखाली आहेत”, असं युसूफ म्हणाले.