पाकिस्तानवर विश्वास टाकला जाऊ शकत नाही, ही अनेक भारतीयांच्या मनातील शंका त्या देशाने खरी ठरवली आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन दिवसांतच, मुंबई हल्ल्याबाबत आम्हाला भारताकडून आणखी पुरावे व माहिती हवी आहे, तसेच काश्मीरचा विषय अॅजेंडय़ावर असल्याशिवाय कुठलीच बोलणी होऊ शकत नाहीत, असे पाकने स्पष्टपणे सांगितले आहे.
यापूर्वी अनेकदा घेतलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, ‘काश्मीरचा मुद्दा अॅजेंडय़ावर केल्याशिवाय भारतासोबत कुठल्याही प्रकारचा संवाद होऊ शकत नाही,’ असे पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ म्हणाले. गेल्या आठवडय़ात रशियातील उफा येथे झालेल्या नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ या दोन पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान हजर असलेले अझीझ यांनी पत्रकार परिषदेत दोन पानांचे निवेदन सादर करून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीला गती देण्याचे उपाय शोधले जातील, असे मोदी- शरीफ यांच्या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले होते. परंतु यासाठी काही वेळ लागेल, असे सांगून अझीझ यांनी जबाबदारी भारतावर ढकलली. मुंबई हल्ल्याची सुनावणी संपवण्याकरिता आम्हाला अधिक माहिती हवी आहे. उफातील निवेदनात ‘अतिरिक्त माहिती’ असे या संदर्भातच म्हटले आहे, असे ते म्हणाले.
रशियातील संयुक्त निवेदनात काश्मीरचा मुद्दा वगळण्यात आल्यामुळे पाकिस्तानात नवाझ शरीफ यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र पाकिस्तानी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रसंघासमोरील वार्षिक भाषणात आमची या मुद्दय़ावरील तात्त्विक भूमिका नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट केली होती. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना राजकीय, नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देणे सुरूच ठेवू, हे अझीझ यांचे वक्तव्य लोकभावना शांत करण्यासाठी केल्याचे मानले जात आहे.
भारताने ज्या मुद्दय़ांबाबत वारंवार खंडन केले आहे, ते समझोता एक्स्प्रेसमधील स्फोट आणि बलुचिस्तान हे मुद्दे अझीझ यांनी उकरून काढले. समझोता एक्स्प्रेसवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची काय प्रगती झाली, याची भारताने माहिती द्यावी.
बैठकीतून मोठा उद्देश साध्य
उफातील बैठक ही कुठल्याही संवादप्रक्रियेची औपचारिक सुरुवात नव्हती; पण जम्मू-काश्मीरच्या प्रमुख मुद्दय़ासह द्विपक्षीय आणि क्षेत्रीय हिताच्या सर्व मुद्दय़ांवर रचनात्मक संवाद होण्यासाठी दोन्ही देशांनी तणाव व शत्रुत्व कमी करावे, हा मोठा उद्देश शरीफ व मोदी यांच्या बैठकीने साध्य झालेला आहे, असे प्रतिपादन अझीझ यांनी केले.
काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर हल्ला
पाकिस्तानने आपल्या भूमिकेबाबत ‘यू टर्न’ घेतल्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामाबादबाबत ‘एकतर्फी’ धोरण राबवत असल्याचा आरोप करून काँग्रेसने त्यांच्यावर हल्ला चढवला. मुंबई हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीला वेग देण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्यानंतर तीनच दिवसांत पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देऊन, नवाझ शरीफ यांच्यासोबत रशियात द्विपक्षीय बैठक घेण्याच्या औचित्याचे मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली.पाकिस्तानी शासकांना मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा व्हावी असे वाटत नाही, हे अतिशय स्पष्ट आहे. या पाश्र्वभूमीवर, पंतप्रधान स्तरावरील नेत्यांच्या बैठकीचे काही औचित्य नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यासाठी देशाला उत्तरदायी आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा