पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात आली आहे. आमिर लियाकत असे या अँकरचे नाव असून त्याने पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांच्यावरही आपली नाराजी व्यक्त केली आहे. तारेक फतेह यांच्याबाबतीत बोलताना त्याची जीभ नरेंद्र मोदींवर घसरली. त्याने मोदींच्या वैवाहिक जीवनाबद्दलही वक्तव्य केले. मोदी हे गुजरातचे कसाई असल्याची टीका त्याने केली. सुमारे तासभर लांबीचा हा व्हिडिओ पाकिस्तानी वाहिनीने प्रक्षेपितही केला. एवढ्यावरच आमिर लियाकत थांबला नाही. तारिक फतेह हे ‘रॉ’ आणि मोदींशी संबंधित असल्याचे त्याने म्हटले. आपल्या संपूर्ण कार्यक्रमात त्याने तारेक फतेह यांचा भंडाफोड केल्याचा दावा केला. कार्यक्रमात त्याने अत्यंत अर्वाच्च भाषा वापरली.

मोदींबाबत असे वक्तव्य करण्याची पाकिस्तानी माध्यमांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी मुद्रित आणि वृत्त वाहिन्यांनीही अशी शेरेबाजी केली आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांत करण्यात आला होता. ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत भारतीय माध्यमांत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे. ओम पुरी यांचा मृतदेह हा नग्नावस्थेत आढळल्याचे काही माध्यमांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी माध्यमांत सलमान खान आणि फवाद खान यांचीही हत्या केली जाईल असे वृत्त येत आहे. ओम पुरी हे मोदींविरोधात होते म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा पाकिस्तानी माध्यमातून दावा केला जात आहे. गतवर्षी जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली होती. त्यावेळी ओम पुरी यांनी याला विरोध केला होता. जवानांना सैन्य दलात सहभागी होण्यासाठी बाध्य करण्यात आले नव्हते, असे वक्तव्य त्यांनी शहीद जवानांनाबाबत म्हटले होते. परंतु नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर खेदही व्यक्त केले होते.

Story img Loader