पाकिस्तानी तुरुंगातील हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेला भारतीय कैदी सरबजितसिंग याला उपचारांसाठी परदेशात हलविणार असल्याचे वृत्त पाकिस्तानातील वरिष्ठ अधिकाऱयांनी फेटाळले आहे. सरबजितवर पाकिस्तानातच उपचार करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. 
सरबजितच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या समितीचे आणि जिना रुग्णालयाचे प्रमुख मोहम्मद शौकत यांनी त्याच्या प्रकृतीची सोमवारी सकाळी तपासणी केली. सरबजितची प्रकृती खालावली असून, तो जिवंत राहण्याची शक्यता अंधुक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टरांनी सांगितले. येथे आलेले सरबजितचे कुटुंबीय या घडामोडींमुळे व्याकूळ झाले असून, त्यांनी त्याला भारतात उपचारासाठी नेऊ देण्याची विनंती पाकिस्तान सरकारला केली आहे. मेंदूला जबरदस्त दुखापत झाल्याने सरबजित अत्यवस्थ आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याजवळ जाता आले नाही. खिडकीतून पाहण्यावरच त्यांना समाधान मानावे लागले. त्याच्या मज्जासंस्थेवर मारहाणीने विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानने राजनैतिक अधिकाऱ्यांना सरबजितची नियमित भेट घेण्याची परवानगी रविवारी रात्री दिली असल्याचे समजते.
सरबजितला उपचारांसाठी परदेशात नेले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिले होते. मात्र, अधिकाऱयांनी ते साफपणे फेटाळले.

Story img Loader