हैदराबाद येथील बाँबस्फोटांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी येथे केला. भारताविरुध्दच्या छुप्या युध्दात पाकिस्तान सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या शेजारील देशाला गेल्या काही दशकांमध्ये भारताविरुध्दच्या युध्दात यश मिळालेले नाही. त्यामुळे त्याने आता छुपे युध्द सुरु केले आहे. भारताला त्रास देण्यासाठी दहशतवादाचा मार्ग अनुसरला आहे. हैदराबादमधील स्फोटामागे पाकिस्तानचा हात आहेच. यात तिळमात्र शंका नाही, असे अडवाणी यांनी पत्रकारांना सांगितले.
पाकिस्तानची भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरू दिली जाणार नाही, असे वचन पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीच्या वेळी दिले होते. त्याचे पालन पाकिस्तानने केले पाहिजे, अशी अपेक्षा अडवाणी यांनी व्यक्त केली.
हैदराबादमध्ये झालेल्या स्फोटांशी आमचा काही संबंध नाही, असे सांगून पाकिस्तानला आपली जबाबदारी झटकून टाकता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader