पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय उलथापालथ झाली आहे. संपूर्ण देश साखरझोपेत असताना पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली असून यामुळे पंतप्रधानांचाही कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. संसदेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तीन दिवस आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने आता येथे काळजीवाहू पंतप्रधानांची नेमणूक करण्यात येणार आहे.
संसदेच्या पाच वर्षांचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार होता. त्यानंतर, सार्वत्रिक निवडणुका पाकिस्तानात घेण्यात येणार होत्या. परंतु, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच संसद बरखास्त करण्यात आल्याने निवडणुका होईपर्यंत देशावर नियंत्रण ठेवण्याकरता काळजीवाहू प्रशासनाची निवड केली जाणार आहे. तसंच, येत्या ९० दिवसांत निवडणुका घेता याव्यात याकरता संसदेत विरोधी पक्षनेताही निवडला जाणार आहे.
राष्ट्रपतींकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कलम ५८(१) अंतर्गत नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे.” या मंजुरीनंतर, केंद्रीय मंत्रिमंडळ देखील विसर्जित झाली.
हेही वाचा >> ‘कीटकांचा वावर असलेल्या कोठडीत राहायचे नाही!’ इम्रान खान यांची तुरुंग प्रशासनाकडे तक्रार
विरोधी पक्षनेत्याशी चर्चा करून काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. दरम्यान, नव्या जनगणनेच्या आधारे शेकडो मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आल्याने पाकिस्तानात मतदान प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.
केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान शेहबाज म्हणाले की, हा त्यांच्या सरकारचा सत्तेतील शेवटचा दिवस होता. युती सरकारने देशाच्या फायद्यासाठी त्यांच्या राजकीय भांडवलाचा त्याग केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते राष्ट्रीय सभेला संबोधित करण्यासाठी संसद भवनात गेले. त्यांनी इतर खासदारांसोबत नॅशनल असेंब्लीच्या आत आणि संसद भवनाबाहेर फोटो काढले.
दरम्यान, काळजीवाहू पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत, पंतप्रधान शेहबाज हे हंगामी पंतप्रधान म्हणून काम पाहतील. घटनेच्या कलम ९४ नुसार, काळजीवाहू पंतप्रधान पदावर येईपर्यंत मावळते पंतप्रधान पदावर राहू शकतात, राष्ट्रपती तशी परवानगी देऊ शकतात.