पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन (पीआयए) च्या विमानात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील सीटवर आणि विमानाच्या खिडकीवर लाथा मारल्या आहेत. त्याने विमानाची खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे विमानातील इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली आहे. यादिवशी संबंधित प्रवाशी पीआयएच्या पीके-२८३ फ्लाइटमधून पेशावर ते दुबई प्रवास करत होता. पेशावर येथून विमानाने उड्डाण केल्यानंतर, तो फ्लाइट क्रूकडे विमानातून उतरवण्यास सांगत होता. पण विमान हवेत असल्याने फ्लाइट क्रूने त्याची मागणी अमान्य केली. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशाने विमानाच्या खिडकीला लाथ मारली आहे. हा सर्व प्रकार विमानातील एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे.
हेही वाचा- अमेरिकेत दोन विमानांची हवेत समोरासमोर धडक, थरारक घटनेत तिघांचा मृत्यू
संबंधित प्रवाशाला फ्लाइट क्रू शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान त्यानं विमानाच्या खिडकीवर लाथ मारल्याचंही दिसत आहे. क्रू मेंबरच्या म्हणण्यानुसार, प्रवाशाने आपलं सर्व सामान काढून टाकलं होतं. इतर प्रवाशांचा रस्ता अडवण्यासाठी तो विमानातच खाली झोपला. शिवाय त्याने विमानात खाली बसून नमाज पठनही केलं आहे.
पाकिस्तानी प्रवाशी विमानाची खिडकी फोडतानाचा व्हायरल VIDEO
या प्रकारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून फ्लाइट क्रूने विमान वाहतूक कायद्यानुसार संबंधित प्रवाशाला सीटवर बांधलं, याबाबचं वृत्त डॉनने दिले आहे. हे विमान दुबईला उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं आहे. शिवाय पीआयएने या प्रवाशाला काळ्या यादीत टाकलं आहे.