Champions Trophy 2025 Updates: यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. यजमान देश असल्यामुळे स्पर्धेमध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या आपल्या संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. जवळपास २८ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात होतं. मात्र, या स्पर्धेत पाकिस्तानला गट फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारताविरूद्धही पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. बांगलादेशनंही हरवल्यानंतर पाकिस्तानला रिकाम्या झोळीनंच घरी परतावं लागलं. आता पाकिस्तान सरकारनं आपल्या संघाचा पराभव गांभीर्यानं घेतला असून थेट देशाच्या संसदेत टीम पाकिस्तानच्या या अवस्थेवर चर्चा करण्याची तयारी चालवली आहे!

स्पर्धेतून एकही सामना न जिंकता बाहेर पडल्यामुळे पाकिस्तान संघावर पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांकडून, माजी खेळाडूंकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर संघाबाबत व संघातील अनेक दिग्गज खेळाडूंबाबत मीम्स व्हायरल होत आहेत. या सर्व वातावरणात आता संघाच्या कामगिरीवर थेट पाकिस्तानच्या संसदेत चर्चा करण्याच्या तयारीत पाकिस्तान प्रशासन असून त्याबाबत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. एनडीटीव्हीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मुद्दा केंद्रीय मंत्रिमंडळात व संसदेतही!

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी जिओ टीव्ही चॅनलला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये पाकिस्तान संघाच्या या कामगिरीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB ला दोषी धरलं आहे. “पीसीबी ही स्वतंत्र संस्था आहे. त्यांना हवं तसं ते वागू शकतात आणि ते तसंच वागले आहेत. पण त्यांनी जे काही केलं आहे, त्याबाबत मी पंतप्रधानांना विनंती करणार आहे की हा मुद्दा केंद्रीय मंत्रिमंडळात व संसदेत चर्चेला घ्यावा”, असं राणा म्हणाले आहेत.

“गेल्या काही दशकांमध्ये पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणि क्रिकेट बोर्डामध्ये अनेक चढउतार आपण पाहिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांआधी काळजीवाहू सरकारनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून पूर्णपणे मुक्त केलं आहे”, असंही राण यांनी नमूद केलं आहे.

PCB ला प्रत्येक पैशाचा हिशेब द्यावा लागणार?

दरम्यान, यावेळी बोलताना राणा यांनी पीसीबीच्या आर्थिक व्यवहारांवर पाकिस्तान सरकारचं नियंत्रण असण्याची गरज अधोरेखित केली. “क्रिकेट बोर्डाच्या उच्चपदस्थांकडून ज्या प्रकारे खर्च केले जात आहेत, त्याची सर्व माहिती पाकिस्तानच्या जनतेसमोर व संसदेसमोर यायला हवी. आपल्या संघाच्या मेंटॉर्सला ५० लाख रुपये दिले जात आहेत आणि ते जाहीरपणे माध्यमांमध्ये म्हणतायत की त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे त्यांना माहितीच नाही. याचा अर्थ काम न करण्याचे ते पैसे घेत आहेत”, असा आरोपही राणा यांनी केला.

“तुम्ही जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना दिल्या जात असलेल्या सोयी-सुविधा पाहिल्या तर तुम्ही म्हणाल की हा पाकिस्तान आहे की कुठला विकसित युरोपियन देश? गेल्या काही काळापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात लोकांकडून वाट्टेल तशी पदं घेतली जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रिकेट टीमची सध्याची अवस्था झाली आहे. यात सुधारणा होणं गरजेचं आहे. जगभरात जसे क्रिकेट बोर्ड आहेत, त्याप्रमाणे स्थिर क्रिकेट बोर्ड पाकिस्तानमध्ये असायला हवे”, अशी गरज राणा यांनी यावेळी व्यक्त केली.

Story img Loader