ईदच्या सणाला सीमेवर पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय जवानांकडून मिठाई देऊन शुभेच्छा देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. यंदाही भारताने या परंपरेचे पालन केले, मात्र पाकिस्तानकडून या वेळी मिठाई अव्हेरण्यात आली. असे असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईदनिमित्त आंब्याची पेटी भेट म्हणून पाठविली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये दोन्हीकडे जीवितहानी झाली. शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा भारताने दिला. त्या पाश्र्वभूमीवर नवाझ शरीफ यांच्या ‘मँगो डिप्लोमसी’ची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षीही शरीफ यांनी मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आंब्याची पेटी भेट म्हणून पाठविली होती. परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेतून भारताने माघार घेतल्यानंतर लगेचच शरीफ यांनी आंब्याची पेटी पाठविली होती.

Story img Loader