पाकिस्तानमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडते आहे. या निवडणुकीनंतरच हे स्पष्ट होईल. यावेळी नवाज शरीफ यांचं पारडं जड असल्याची चर्चा पाकिस्तानात आहे. मात्र पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची खुर्ची शापित आहे का? ही चर्चा रंगण्याचं कारण पाकिस्तानात मागच्या ७६ वर्षात २१ पंतप्रधानांनी २४ वेळा पंतप्रधानपद भुषवलं. मात्र कुणीही पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करु शकलं नाही. कुणी १३ दिवसांसाठी पंतप्रधान झालं, तर कुणी ५४ आणि ५५ दिवसांसाठी. सर्वात दीर्घ कार्यकाळ होता ४ वर्षे ८६ दिवसांचा.
नवाज शरीफ आणि बेनझीर भुत्तो
पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांनी तीनवेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र तीन टर्म मिळून त्यांचा कार्यकाळ ९ वर्षे १७९ दिवसांचाच राहिला. आता चौथ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नवाज शरीफ बसतील अशी चर्चा पाकिस्तानात होते आहे.
बेनझीर भुत्तो दोनदा पंतप्रधान
बेनझीर भुत्तो या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. १९८८ मध्ये त्या पंतप्रधान झाल्या. त्यानंतर १९९० ला त्यांना पद सोडावं लागलं. तर १९९३ ला त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. पण १९९६ पर्यंतच त्यांना हे पद भुषवता आलं. पाकिस्तानचे सहा पंतप्रधान असे होते ज्यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. १८ असे प्रसंग घडले जेव्हा पंतप्रधान पद त्यांना सोडावं लागलं.
काय सांगतो पाकिस्तानचा इतिहास?
१९९३ मध्ये पाचवेळा पंतप्रधान बदलण्यात आले. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीने अनेक आव्हानांचा सामना केला आहे हेच हा इतिहास सांगतो आहे. बेनझीर भुत्तो यांची हत्या झाली तर जुल्फिकार अली भुत्तो यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीचा ७६ वर्षांचा इतिहास
२१ पंतप्रधानांनी ७६ वर्षांत २४ वेळा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
एकाही पंतप्रधानाने आत्तापर्यंत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही
नवाज शरीफ आत्तापर्यंत तीनवेळा पंतप्रधान झाले
नवाज शरीफ यांचा तीन टर्मचा एकूण कार्यकाळ ९ वर्षे १७९ दिवस
बेनझीर भुत्तो पाकिस्तानच्या दोनदा पंतप्रधान होत्या
पाकिस्तानचे सहा पंतप्रधान असे होते ज्यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही.
१८ असे प्रसंग घडले ज्यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानाला खुर्ची सोडावी लागली.
एका पंतप्रधानाची हत्या तर एकाला फाशीची शिक्षा झाली
१९९३ मध्ये पाच वेळा पंतप्रधान बदलण्यात आले.
१३ दिवसांचं पंतप्रधान पद
नुरुल अमीन हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते मात्र फक्त १३ दिवस. इतका कमी कार्यकाळ पंतप्रधान असलेले पाकिस्तानचे ते एकमेव नेते आहेत. त्यानंतर सुजात हुसैन हे ५४ दिवस तर इब्राहीम इस्माईल हे ५५ दिवस पंतप्रधान होते.
प्रदीर्घ कारकीर्द कुणाची होती?
युसुफ रझा गिलानी हे ४ वर्षे ८६ दिवस म्हणजे सर्वात प्रदीर्घ काळ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यानंतर लियाकत अली खान यांनी ४ वर्षे ६३ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहिले ते म्हणजे नवाज शरीफ त्यांनी ४ वर्षे ५३ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला. News 18 ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानात आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक पार पडते आहे. यानंतर पंतप्रधान निवडले जातील. पुन्हा एकदा नवाज शरीफ यांच्या नावाची चर्चा आहे. तर बिलावल भुत्तो हेदेखील विश्वास व्यक्त करत आहेत की विजय त्यांचा होईल. इम्रान खान तुरुंगात आहेत. त्यांच्या पक्षाकडून निवडणूक चिन्ह हिसकावण्यात आलं आहे त्यामुळे त्यांचे उमेदवार अपक्ष लढत आहेत.
हे पण वाचा- नवाज शरीफ, बिलावल भुत्तो की इम्रान खान? कुणाला मिळणार पाकिस्तानची सत्ता? समोर आलेल्या ‘या’ अहवालाने खळबळ
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकत्रच स्वतंत्र झाले. दोन्ही ठिकाणी असलेली त्यावेळची आर्थिक, भौगोलिक आणि सामाजिक स्थिती एकसारखी होती. मात्र आजची पाकिस्तानची स्थिती खूप वाईट आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. तसंच दहशतवादासाठीही पाकिस्तान ओळखला जातो. अशात पाकिस्तानात निवडणुकीनंतर काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.