देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय उपकरण, ऑक्सिजन याची उणीव भासत आहे. तसेच रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची रुग्णालयाबाहेर रांग लागली आहे. अनेकांना बेड मिळत नाही. त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताचं सांत्वन करणारं ट्वीट केलं आहे.
‘करोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना समजू शकतो. या करोनामुळे पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो. ते लवकर बरे व्हावे. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे’, असं ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.
I want to express our solidarity with the people of India as they battle a dangerous wave of COVID-19. Our prayers for a speedy recovery go to all those suffering from the pandemic in our neighbourhood & the world. We must fight this global challenge confronting humanity together
— Imran Khan (@ImranKhanPTI) April 24, 2021
‘करोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्याऱ्या भारतीयांसोबत आम्ही आहोत. आम्ही पाकिस्तानच्या नागरिकांकडून करोना प्रभावित कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. या करोना संकटात मानवतेची विचारधारा लक्षात ठेवली पाहीजे. राजकारण बाजूला ठेवून या संकटाशी सामना केला पाहीजे. पाकिस्तान सार्क देशांसोबत एकत्र येऊन या संकटाशी सामना करण्याचं कार्य सुरुच ठेवणार’ असं ट्वीट पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केलं आहे.
#COVID19 is yet another reminder that humanitarian issues require responses beyond political consideration. Pakistan continues to work with SAARC countries to foster cooperation to tackle the pandemic. https://t.co/hgpp0vxjSM
— Shah Mahmood Qureshi (@SMQureshiPTI) April 24, 2021
भारतातील गंभीर परिस्थिती पाहून पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाउंडेशनने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केलीय. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी संस्थेचं कौतुक केलं जात आहे.
पाकिस्तानात जवळपास एका दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी व बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमध्ये एधी फाउंडेशननेच केली होती. गीता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला एक कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती.