Nawaz Sharif on War with India: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कालगिल युद्धानंतर २६ वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी युद्धासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं असतानाच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी आजी पंतप्रधानांना भारताशी युद्ध टाळण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विद्यमान पंतप्रधान व त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांना भारताशी युद्ध टाळण्याचा सल्ला दिला आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धावेळी हेच नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. कारगिल युद्धानंतर नवाज शरीफ यांनी सातत्याने भारतासोबतचे संबंध तणावपूर्ण होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. पण आता त्यांच्या धाकट्या बंधूंच्या कार्यकाळात पाकिस्ताननं पुन्हा आगळीक करून भारताचा संताप ओढवून घेतला आहे.
शरीफ बंधूंची लाहौर येथे भेट
कारगिल युद्धाचा अनुभव गाठिशी असल्यामुळे नवाज शरीफ यांनी शाहबाज शरीफ यांना दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरला आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांनी लाहौर येथील त्यांच्या घरी मोठे बंधू नवाज शरीफ यांची भेट घेतली. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत त्यांनी नवाज शरीफ यांना माहिती दिली.
रविवारी संध्याकाळी झालेल्या या भेटीत शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना सीमेवरील परिस्थिती, पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं उचललेली कठोर पावलं आणि त्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पाकिस्ताननं भारताविरोधात उचललेली पावलं यासंदर्भात माहिती दिली. भारतासाठी हवाई हद्द बंद करणं, सीमा बंद करणं अशा प्रकारच्या निर्णयांचीही माहिती दिली.
नवाज शरीफ म्हणाले, युद्ध नकोच!
दरम्यान, एकीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ‘पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे’ अशी दर्पोक्ती केली असताना दुसरीकडे तीन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळलेले नवाज शरीफ यांनी मात्र युद्ध टाळण्याचा सल्ला दिला आहे. शरीफ यांनी १९९० ते ९३, १९९७ ते ९९ आणि २०१३ ते १७ या काळात पाकिस्तानचं पंतप्रधानपद सांभाळलं आहे.
पाकिस्तान सरकारनं सध्याच्या काळात भारताशी संबंध पूर्ववत करण्यासाठी जितके राजनैतिक पर्याय उपलब्ध असतील, ते सर्व वापरण्याचा सल्ला नवाज शरीफ यांनी शाहबाज शरीफ यांना दिला. तसेच, भारताविरोधात आक्रमक पावलं उचलणं टाळायला हवं, असंही त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सांगितलं आहे.
नवाज शरीफ यांची भारतविषयक भूमिका
दरम्यान, भारताशी पाकिस्तानचे सौहार्दपूर्ण संबंध असायला हवेत, असा प्रयत्न याआधीही नवाज शरीफ यांनी केला आहे. मुंबई हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमध्ये खटला चालवण्याबाबत शरीफ यांनी विधान केलं होतं. “दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. आपण अशा लोकांना सीमा ओलांडून पलीकडे जाऊन मुंबईत १५० लोकांना ठार करण्याची मोकळीक देऊ शकतो का? सांगा मला. आपण त्यासंदर्भातला खटला पूर्ण का करू शकत नाहीत?” असा सवाल नवाज शरीफ यांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला होता.