पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी देशाला भारताबरोबर शांततापूर्ण संबंध हवे असल्याचं म्हटलं आहे. मात्र असं म्हणताच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानने काश्मीर प्रश्नाचाही उल्लेख करत दुतोंडी भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ७७ व्या अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. एकीकडे शांतता प्रस्थापित करण्यासाठीची भूमिका मात्र भारताने वारंवार स्पष्ट करुनही काश्मीरचा मुद्दा पुन्हा उकरुन काढण्याची खोड पाकिस्तानने या वेळीही कायम ठेवली.
“सर्व शेजारी राष्ट्रांबरोबर आम्हाला शांततापूर्ण संबंध हवे आहेत. यामध्ये भारताचाही समावेश आहे. दक्षिण आशियामध्ये दिर्घकालीन शांततापूर्ण वातावरण असावे अशी आमची भूमिका आहे. मात्र त्यावेळी आम्ही जम्मू आणि काश्मीर वादावर तोडगा काढण्याच्या मागणीचेही पुरस्कर्ते आहोत,” असं शहाबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये काश्मीरसंदर्भात आपली भूमिका मांडताना कायमच काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं अधोरेखित केलं आहे. काश्मीरचा मुद्दा हा दोन्ही देशांमधील वादाचा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळेच एकीकडे शांततेसंदर्भातील मागणी आणि त्याचवेळी काश्मीरचा मुद्दा नव्याने उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केल्याचं दिसत आहे.
“रचनात्मक सहभागासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी भारताने विश्वासार्ह पावले उचलायला हवीत.आपण एकमेकांचे शेजारी आहोत आणि आपण कायम शेजारी राहणार आहोत. आपण शांततेत राहायचे की एकमेकांशी लढत राहायचे हा निर्णय आपला आहे,” असं पाकिस्तानी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमधील भाषणात म्हटलं आहे.
“१९४७ पासून आजपर्यंत आमच्यात तीन युद्धे झाली आहेत. या युद्धाचा परिणाम म्हणून दोन्ही बाजूंना फक्त दुःख, गरिबी आणि बेरोजगारी वाढली आहे. शांततापूर्ण वाटाघाटी आणि चर्चेद्वारे आमचे मतभेद, समस्या सोडवणे आता आपल्यावरच अवलंबून आहे,” असंही शहाबाज यांनी म्हटलं.
शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पूर परिस्थितीबद्दलही विस्तृतपणे माहिती दिली. “या महापुरात ४०० हून अधिक मुलांसह माझ्या देशातील १५०० हून अधिक लोक या मरण पावले. आणखी बरेच लोक रोग आणि कुपोषणाच्या सावटाखाली आहेत. हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या या नैसर्गिक आपत्तीनंतर लाखो स्थलांतरित अजूनही विस्थापितांच्या छावण्यांच्या शोधात आहेत,” असं शरीफ म्हणाले.