लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या बहुमतानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – मविआच्या जल्लोषात पाकिस्तानी झेंडे फडकले? नगरच्या Video चा नाशिकशी संबंध? मुस्लिम कार्यकर्त्यांच्या हातात होतं तरी काय, पाहा

पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भारताच्या शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदींचे अभिनंदन केले होते. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून अशाप्रकारची कोणीतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. अशाच दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झाहरा बलोच यांनी पाकिस्तानने परिपक्वता दाखवत भारतीय पंतप्रधानांचे अभिनंदन करायला हवे, अशा प्रकारचं विधान केलं होते.

“भारतातील निवडणूक प्रक्रियेबाबत आम्हाला कोणतीही टिप्पणी करायची नाही. आपला नेता म्हणून कोणाची निवड करायची, हा भारतीय जनतेचा अधिकार आहे. मात्र, दोन देशांबाबत बोलायचं झाल्यास, पाकिस्तानने परिपक्वता दाखल भारतीय पंतप्रधानांचं अभिनंदन करायला हवं”, असे त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, आता शपथविधीनंतर शहाबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेप

शपथविधी सोहळ्याचे पाकिस्तानला आमंत्रण नाही

रविवारी ( ९ जून ) पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारताच्या शेजारी देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये नेपाळ, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका यासारख्या देशांचा समावेश होता. मात्र, या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रित देण्यात आलेलं नव्हतं. खरं तर मागील काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणल्या गेले, त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीचे आमंत्रण नसल्याचे बोललं जात होतं.