Pakistan PM Shehbaz Sharif Viral Video: आर्थिक विकास, सामाजिक विकास किंवा इतर कोणत्याही निकषांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे असला, तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मात्र एक दिवस पाकिस्तान भारताला मागे टाकेल, असा विश्वास वाटत आहे. एवढंच नव्हे, तर शाहबाज शरीफ यांनी जर असं झालं नाही, तर आपलं नाव शाहबाज शरीफ नाही, अशी घोषणाच करून टाकली आहे! पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायासमोर उत्साहित झालेल्या शरीफ यांनी हे विधान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात डेरा गाझी खान भेटीसाठी शाहबाज शरीफ सोमवारी दाखल झाले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा विकास, जागतिक पटलावर पाकिस्तानची यशस्वी घोडदौड आणि पाकिस्तानला चांगले दिवस आणून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, पाकिस्तानमधील नागरिकांनी यात दिवस-रात्र मेहनत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शाहबाज शरीफ यांनी आपल्या हाताची मूठ पोडियमवर आपटत भारताला हरवण्याची शपथ घेतली!
नेमकं काय घडलं?
या कार्यक्रमात उपस्थित पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले, “पाकिस्तानची प्रगती साध्य करण्यासाठी आपण सगळे दिवस-रात्र काम करू. परमेश्वरानं कायम पाकिस्तानवर कृपादृष्टी ठेवली आहे. मी नवाज शरीफ यांचा चाहता आहे, त्यांचा अनुयायी आहे. आज मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की आपण सगळे मिळून मेहनत करू आणि पाकिस्तानला महान बनवू”, असं शाहबाज शरीफ म्हणाले.
पाकिस्तानच्या विकासाचे दावे करताना शरीफ यांनी भारताला हरवण्याबाबतचा उल्लेख केला. “जर पाकिस्तानला पुन्हा महान बनवून आपण हिंदुस्थानला पराभूत केलं नाही, तर माझं नाव शाहबाज शरीफ लावणार नाही”, असा निर्धारच शरीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!
शाहबाज शरीफ यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे पाकिस्तान जागतिक स्तरावर आर्थिक विकासाच्या बाबतीत किंवा सामाजिक सुरक्षितता वा राहणीमानाच्या बाबतीत यादीमध्ये खालच्या क्रमांकावर असताना दुसरीकडे शरीफ यांच्याकडून नुसतीच खोटी आश्वासनं दिली जातात, अशी टीका पाकिस्तानमधील नेटिझन्स करताना दिसत आहेत.
हे विधान करण्याच्या काही दिवस आधीच शाहबाज शरीफ यांनी भारताशी बंद झालेला पाकिस्तानचा संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पाकिस्तान जोपर्यंत आपल्या भूमीवरील दहशतवाद संपवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही, अशी भूमिका भारतानं स्पष्ट केली आहे.