पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख तसेच राष्ट्रपती राहिलेल्या परवेझ मुशर्रफ यांच्यामागील कटकटी अधिकच वाढत आहेत. न्यायाधीशांचे निलंबन तसेच बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुशर्रफ यांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे. त्यातच आता सन २००६ मध्ये लष्करी कारवाईत बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी नेते अकबर बुग्ती यांची हत्या केल्याच्या आरोपावरून मुशर्रफ यांची चौकशी करण्यास पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना परवानगी दिली.
मुशर्रफ लष्करप्रमुख असताना राबवलेल्या लष्करी कारवाईत बुग्ती मारले गेले होते. रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्या. चौधरी हबिब उर रहमान यांनी बलुचिस्तान पोलिसांना मुशर्रफ यांची चौकशी करण्याची परवानगी दिली. न्यायालयाच्या परवानगीनंतर पाच जणांचे पोलीस पथक तातडीने मुशर्रफ यांच्या फार्महाऊसवर चौकशी करण्यासाठी पोहोचले.
याच प्रकरणात मुशर्रफ राष्ट्रपती असताना त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आफताब अहमद खान शेरपाओ यांनी क्वेट्टा येथील दहशतवादीविरोधी न्यायालयात हजेरी लावली. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पुढील सुनावणीसाठी हजर न राहण्याची मुभा मागितली. न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी १६ मेपर्यंत पुढे ढकलली आहे.
दरम्यान, २००७ मध्ये आणीबाणीदरम्यान न्यायाधीशांचे निलंबन तसेच माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुशर्रफ यांना अटक करून त्यांच्या फार्महाऊसवर ठेवण्यात आले आहे. २००७ मध्ये बेनझीर भुत्तो परदेशातून पाकिस्तानात परतल्यानंतर यांना योग्य ती सुरक्षा पुरविली नसल्याचा आरोप मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मुशर्रफ चार वर्षांच्या कालावधीनंतर निवडणुकीच्या धामधुमीत गेल्या महिन्यात पाकिस्तानात परतले. मुशर्रफ पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांना अटक करून नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. याशिवाय ३० एप्रिल रोजी पेशावर न्यायालयाने मुशर्रफ यांना निवडणूक लढण्यासही आजीवन  बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा